आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळी पावसाची हजेरी:विजेचे खांब पडल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित ; दिंडोरी तालुक्यात घरांचे पत्रे उडाले

दिंडोरी19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने शनिवारी जोरदार तडाखा दिला. सोसाट्याच्या वाऱ्याने अनेक घरांवरील पत्रे उडून गेली. दिंडोरी शहराला वादळी पावसाने झोडपून काढले.पावसाचे आगमन होताच विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. तालुक्यातील मोहाडी, जानोरी, ओझे, करंजवण, म्हेळुस्के परिसरात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे अनेक शेतकरी कुटुंबांच्या घराचे पत्रे उडाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर वणीजवळील आंबानेर येथील शेतकरी किरण अशोक धुगे यांची दोन एकर द्राक्षबाग वादळी पावसाने भुईसपाट झाली आहे.

विजेचे पोल पडल्यामुळे या परिसरातील विजेचा पुरवठा रात्रीपासून बंद आहे, वादळामुळे पत्रे उडाल्यामुळे अनेकाचे कांदे ओले झाल्यामुळे नुकसानीची शक्यता निर्माण झाली आहे. ओझे येथे ग्रामसेवक धीरज भांबरे, सरपंच आनंदा धुळे, उपसरपंच विमलताई बर्डे यांनी नुकसानीची पाहणी केली.

नामपूरसह परिसरात शनिवारी दुपारच्या सुमारास वादळाह झालेल्या पावसाने पावसामुळे नामपूर-ताहाराबाद रस्त्यावर अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत. त्यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. नामपूरसह द्याने, आसखेडा, उत्राणे, वाघळे या परिसरात आंबा पिकाचे नुकसान झाले. जागोजागी कैऱ्यांचा खच पडला होता. पावसामुळे कांदाचाळीचे कागद उडाल्याने कांदा भिजला आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. पावसामुळे विटा भिजल्याने वीटभट्टीचालकांचे नुकसान झाले आहे.

ओझरचा पाणीपुरवठा आज बंद
ओझर | जानोरी परिसरात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे विमानतळासमोर विजेचे खांब कोसळल्याने पुरवठा खंडित झाला. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण केंद्र मोहाडी यांच्याकडून होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. ओझर शहर व उपनगरांत पाणीपुरवठा करणारा जलकुंभ भरलेला नसल्याने रविवारी होणारा ओझर गावातील पाणीपुरवठा हा सोमवारी नियमित करण्यात येईल, असे नगरपरिषदेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...