आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल:पंतप्रधान आवासचे सिन्नरला पहिल्या वर्षी केवळ 635 घरकुलांचे उद्दिष्ट

भरत घोटेकर | सिन्नर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत तालुक्यातील ८६८१ लाभार्थींचा ‘प्रपत्र ड’ यादीत समावेश झाला आहे. या सर्व लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळणार असला तरी पहिल्या वर्षी केवळ ६३५ इतके उद्दिष्ट तालुक्याला प्राप्त झाले आहे. दरवर्षी मिळणाऱ्या उद्दिष्टात वाढ न झाल्यास अनुक्रमांकानुसार शेवटच्या लाभार्थीला घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी तब्बल १३ वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

केंद्र सरकारच्या आदेशाने २०१८ साली गावोगावी सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभासाठी ‘प्रपत्र ड’च्या ग्रामपंचायतनिहाय याद्या तयार करण्यात आल्या. तालुक्यातील ११४ गावांत तब्बल ८६८१ कुटुंबे घरकुल योजनेसाठी पात्र ठरली. मात्र, पहिल्या वर्षी २०२१-२२ सालासाठी केवळ ६३५ इतके उद्दिष्ट राज्य शासनाकडून तालुक्याला प्राप्त झाले आहे. गावोगावी असलेल्या एकूण पात्र कुटुंबसंख्येपैकी घरकुल मंजूर झालेल्या कुटुंबांची संख्या अत्यंत नगण्य आहे. काही ग्रामपंचायतींना केवळ पाच ते सहा घरकुले मंजूर झाली आहेत. त्यामुळे शासनाने गावनिहाय घरकुल उद्दिष्टात वाढ करावी, अशी मागणी पात्र लाभार्थींकडून आता होऊ लागली आहे. नवीन वर्ष सुरू होऊन ऑगस्ट महिना संपत आला तरी २०२२-२३ चे उद्दिष्ट अद्यापही शासनाकडून प्राप्त झालेले नाही.

शासनाकडून उद्दिष्ट देण्यातही विरोधाभास
भोकणी ग्रामपंचायतीत १७१ लाभार्थी पात्र आहेत. पैकी पहिल्या वर्षी ६ तर आडवाडी येथे ६५ लाभार्थींचा यादीत समावेश आहे. पैकी ५ इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे. एकूणच मंजूर लाभार्थींच्या प्रमाणात उद्दिष्ट देणे अपेक्षित असताना शासनाने त्याकडे कानाडोळा केला आहे. नेमकी कुठले निकष लावून उद्दिष्ट ठरवले याचे कोडे ग्रामपंचायतींना पडले आहे.

..अशी आहे तालुक्यातील घरकुलांची स्थिती
सिन्नर तालुक्यात ६३५ घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यापैकी ५२२ घरकुले मंजूर झाली आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी २६७ तर अनुसूचित जाती, जमातीच्या ३६८ कुटुंबांचा समावेश आहे. यातील ३९ घरकुले पूर्ण झाली आहेत. २२७ प्रगतीत तर २५६ कामे सुरू होण्याच्या मार्गावर आहे.

शासनाने उद्दिष्ट वाढवून द्यावे
शासनाने पात्र ठरलेल्या लाभार्थींना तातडीने लाभ देणे अपेक्षित आहे. गावनिहाय उद्दिष्ट कमी असल्याने पात्र लाभार्थींना अनुक्रमांकांनुसार घरकुलाचा लाभ मिळेपर्यंत किमान ५-१० वर्षे वाट पहावी लागेल.- मुक्ताबाई नवले, पात्र लाभार्थी

पाच वर्षांत सर्वांना घरकुल मिळेल
प्रपत्र ड’ यादीत समावेश असलेल्या सर्व लाभार्थींना येत्या पाच वर्षांत घरकुल बांधून देण्याचे शासनाचे नियोजन आहे. पहिल्या वर्षी उद्दिष्ट कमी असले तरी पुढील काळात उद्दिष्टात वाढ होण्याची अपेक्षा आहे. - मधुकर मुरकुटे, गटविकास अधिकारी, सिन्नर

बातम्या आणखी आहेत...