आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री आपल्या दारीया उपक्रम:मालेगावी सात जणांना प्रतिबंधात्मक नाेटिसा

मालेगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मालेगाव दाैऱ्यानिमित्त शहरात पाेलिसांनी कडक बंदाेबस्ताचे नियाेजन केले आहे. ठाकरे व शिंदे समर्थकांच्या गटबाजीचा संघर्ष टाळण्यासाठी सात जणांना प्रतिबंधात्मक नाेटिसा बजावण्यात आल्या आहेत. गरज पडल्यास संबंधितांना स्थानबद्ध करण्याचीही तयारी असल्याची माहिती अपर पाेलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी दिली.

‘मुख्यमंत्री आपल्या दारी’ या उपक्रमाचा शनिवारी (दि. ३०) मालेगाव शहरातून शुभारंभ हाेत आहे. राजकीय बंडखाेरी व सत्तांत्तर नाट्यामुळे शिंदे तसेच ठाकरे गटांमध्ये कमालीचा संघर्ष सुरू आहे. माजी मंत्री दादा भुसे शिंदे गटात गेल्याने स्थानिक काही शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंची नुकतीच भेट घेतली हाेती. मुख्यमंत्र्यांच्या दाैऱ्यात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची पाेलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. ठाकरे समर्थकांसह इतर काही जणांना सीआरपीसी १४१ अंतर्गत प्रतिबंधात्मक नाेटिसा बजावल्या आहेत. यात रामभाऊ मिस्तरी, प्रमाेद शुक्ला, राजाराम जाधव, यशपाल बागूल, अर्जून भाटी, नरेंद्र वसईकर व संगमेश्वरातील कैलास नामक व्यक्तीचा समावेश आहे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण हाेईल असे कुठलेही कृत्य करू नये अशी तंबी संबंधितांना दिली आहे.

हारतुऱ्यांचीही तपासणी
मुख्यमंत्र्यांना दिल्या जाणाऱ्या हारतुऱ्यांचीही तपासणी हाेणार आहे. तपासणीकामी चार पाेलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह क्रीडा संकुलावर हाेणाऱ्या बैठकस्थळी सात अधिकारी, ६० कर्मचाऱ्यांचा खडा पहारा असेल. पाेलिस कवायत मैदानावर हाेणाऱ्या सभेच्या ठिकाणी १३ अधिकारी, १३० कर्मचारी व एक दंगा नियंत्रण पथक तैनात राहणार आहे. नवीन पाेलिस वसाहत शुभारंभाच्या परिसरात ८ अधिकारी व ७० कर्मचाऱ्यांचा बंदाेबस्त आहे. शासकीय विश्रामगृहाला चार अधिकारी व ३५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. शासकीय वाहनांच्या पार्किंगसह रस्ते बंदाेबस्तासाठीही स्वतंत्र पाेलिस अधिकारी व कर्मचारी तैनात केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...