आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाळेगाव ते मुसळगाव ८ किमी लांबीची नवीन मुख्य पाइपलाइन टाकण्याच्या कामासोबतच सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीतील १७ किमी लांबीचे रस्त्याच्या दुतर्फा बंदिस्त गटाराचे बांधकाम करणे, अंतर्गत पाइपलाइन आदी कामांचे प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तयार करून तत्काळ उद्योग संचालनालयाकडे पाठवावा, अशा सूचना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुंबई येथे मंत्रालयात उद्योगमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, उद्योग विभागाचे सहसचिव संजय देगावकर, अतिरिक्त उद्योग आयुक्त कोरबू, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शर्मा, मुख्य अभियंता तुपे, महाव्यवस्थापक (भूसंपादन) संदीप आहेर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कार्यकारी अभियंता जयंत बोरसे आदी उपस्थित होते. स्टाइसच्या वतीने अध्यक्ष नामकर्ण आवारे यांनी विविध प्रश्न उद्योग मंत्र्यांसमोर मांडले. त्यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करत प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. आवारे यांनाही प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आवाहन करत गरज पडेल तिथे अधिकाऱ्यांशी आपण चर्चा करू अशी ग्वाही दिली. याप्रसंगी उपाध्यक्ष सुनील कुंदे, संचालक विठ्ठल जपे, संस्थेचे व्यवस्थापक कमलाकर पोटे उपस्थित होते.
सेझची जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात घेऊन तेथे सामान्य औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना उद्योगमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. टप्पा क्रमांक २, ३, ४ व ६ अतिरिक्त सेझ येथील अधिसूचित क्षेत्र वगळणे या प्रस्तावातील स्टाइस संस्थेच्या मालकीचा मुसळगाव शिवारातील ०३ हे. ६१ आर. गुळवंच शिवारातील ३१.६३ हेक्टर ही अधिसूचित जमीन वसाहतीस औद्योगिक वापरासाठी आवश्यक असल्याने संपादनातून वगळावी, दोन्ही क्षेत्र संपादनातून वगळण्याबाबत शासनाचा निर्णय झालेला आहे. त्यासाठी पुढील कायदेशीर कार्यवाही व शासनाकडे करावयाची पूर्तता आठ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्रकल्पग्रस्तांच्या प्लॉटला मिळणार मुलभूत सुविधा
१५ % औद्योगिक वापराचे प्लॉट दिलेल्या १६४ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्लॉटच्या परिसरात रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीज आदी मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी अध्यक्ष नामकर्ण आवारे यांनी केली. माळेगाव ते मुसळगाव - गुळवंचपर्यंत जलवाहिणीबाबत औद्योगिक विकास महामंडळाच्या केंद्र कार्यालयात आलेल्या प्रस्तावास मंजुरी देण्यात यावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य अभियंता यांना दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.