आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील रस्त्यांमध्ये ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शहरातील शिवाजी चौक, मेनरोड, बाजारवेश, कॉलेज रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड व ठिकठिकाणच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये शुक्रवारी वृक्षारोपण करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) यांच्या वतीने गांधीगिरी आंदोलन करत रस्त्यांच्या दुरवस्थेचा निषेध करण्यात आला. यावेळी १०७० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असणारे निवेदन मुख्यमंत्री, आमदार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी व पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले.
शहरातील मेनरोड, सोमवार पेठ, बाजारपेठ, शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर रोड, होळकर शाळा रोड, मर्चंट कॉलनी रोड, शर्मा कॉलनी रोड, श्रीराम रोड, शिवनेरी चौक, गुजराथ गल्ली रोड आदी वर्दळीच्या रस्त्यांसह अनेक रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांवर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे नेहमी छाेटेमोठे अपघात घडत आहेत. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना अडथळे निर्माण होतात. खड्ड्यांमुळे दुचाकी वाहने स्लीप होऊन वाहनचालकांना इजा होण्याचे प्रकार घडत आहेत तसेच वाहनचालकांना कंबरदुखी, मणक्यांच्या त्रासांना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांतील स्टिल व गज वर आलेले आहेत. या गजांमध्ये पाय अडकून नागरिक, लहान मुले खाली पडतात तर वाहने चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर झाल्यानंतर नवीन रस्ते, गटारी तयार करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे रिपाइंच्या वतीने शहरात ठिकठिकाणी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून या प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. नगरपरिषदेने विकासकामे करून सर्व वार्डात दर्जेदार रस्ते बांधावे अन्यथा रिपाइंतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे, बंडू कापडणी, शिवाजी जाधव, नीलेश जगताप, नीलेश निकम, चंद्रकांत कसबे, दीपक मोरे, किरण केदारे, वसीम शेख, भूषण आबड, अशोक केदारे, सुमित शिंदे, वाईद शेख, जीवन कसबे, अरुण केदारे, प्रशांत उबाळे, विकी गोसावी, किशोर बनकर, नीलेश शेवाळे, फकिरा जाधव, बंडू जाधव, रवी बनकर, मंगेश गायकवाड, विकी काळे, रोशन निरभवणे, समाधान आहेर, अंकुश घोलप आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.