आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दोन दिवसांपासून पावसाची विश्रांती; खरिपाची पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता

मालेगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जून महिन्याचा पहिला आठवडा कोरडा गेल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले. अनेक महसूल मंडलांमध्ये चांगला पाऊस बरसला आहे. सोमवारी सायंकाळी जवळपास संपूर्ण तालुक्यातच पावसाची हजेरी लागल्याने १२ मंडलांतर्गत एकूण २३८.०० मिलिमीटर पाऊस पडल्याची नाोद झाली आहे. जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान १०२.३० मिलिमीटर आहे. मात्र, अर्धा जून महिना संपला असताना तालुक्यात सरासरी ४९.१४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने खरिपाची पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

मालेगाव तालुका नेहमीच दुष्काळाच्या छायेत असतो. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४८० मिलिमीटर आहे. सध्या आर्द्रा नक्षत्र सुरू आहे. प्रारंभीच्या नक्षत्रांमध्ये दमदार पाऊस झाला तर पेरणीच्या कामांना वेग येईल. मात्र, काही भागात अद्याप पाऊस नसल्याने शेतातील ढेकळेदेखील फुटलेले नाही. खरिपाच्या पेरणीसाठी शेतांची मशागत झाली आहे. शेतकऱ्यांनी मका, बाजरी, कापूस बियाणांची खरेदी सुरू केली आहे. कृषी विभागाने बाजरीचे २०,८५९ मक्याचे ४९,२०६ तर कापसाचे २७,५२३ हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. नेहमीच नुकसान सोसणारा शेतकरी यंदा कुठलीही जोखीम घेण्यास तयार नसल्याने खरिपाच्या पेरणीला मुहूर्त लागलेला नाही. दुबार पेरणीचे संकट कोसळले तर पुन्हा महागडी बियाणे कुठून खरेदी करायची या विचारात असलेला शेतकरी सध्या दमदार पावसाची चातक पक्ष्याप्रमाणे वाट पहात आहे.

बातम्या आणखी आहेत...