आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या असलेल्या सिन्नर तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच ८१४ मिमी पाऊस झाला. त्यामुळे यंदा मे महिन्यापर्यंत सिन्नर तालुक्याला टँकरची गरज भासणार नसल्याचे चित्र आहे. असे असले तरी मे महिन्यात किंवा पाऊस लांबल्यास जून महिन्यात तालुक्यातील ५ गावे आणि १९ वाड्या - वस्त्यांना ७ टँकरची गरज भासू शकते, असा अंदाज करत तसे नियोजन पंचायत समिती टंचाई शाखेने केले आहे. तालुक्यात ११४ गावे आणि २५२ वाड्यावस्त्या आहेत. दरवर्षी अनेक गावांना उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासते. यावर्षी मात्र सिन्नर तालुक्यात वरुणराजा मनमुराद बरसला. त्यामुळे तालुक्यातील सर्व बांध- बंधारे आणि धरणे ओसंडून वाहिली. भोजापूर, कोनांबे, सरदवाडी, बोरखिंड धरणांसह अवर्षणग्रस्त पूर्व भागातील दुशिंगपूर, दातली आणि फुलेनगर येथील बंधारे ओव्हरफ्लो झाली. शिवाय पूर्व भागात कुंदेवाडी- सायाळे या देवनदीच्या बंदिस्त पूरचारीचे पाणीही काही भागात पोहाेचल्याने अनेक छोटे-मोठे बंधारे, तळे पूर्ण क्षमतेने भरली. त्यामुळे यंदा अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची टंचाई मिटली आहे.
तथापि, प्रशासनाने काही गावांमध्ये संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकरचे नियोजन केले असले तरी टँकरची गरज भासेलच असेही नाही. टंचाई कृती आराखड्यात टँकरसह विंधन विहिरी खोदणे, प्रगतिशील योजना पूर्ण करणे, हातपंप करणे आणि दुरुस्ती, सार्वजनिक विहिरी करणे, विहीर अधिग्रहण, नळ पाणी पुरवठा योजना यांचे नियोजन केले आहे. त्यात यंदा पाणीटंचाईची शक्यता कमी असल्याने टंचाई शाखा काहीसी सुखावली आहे. घंगाळवाडी येथे एक विहीर अधिग्रहण करण्याची शक्यता वर्तविली अाहे.
या गावांना टँकरने पाणी पुरवठ्याची शक्यता
तालुक्यात चंद्रपूर, वडगाव-सिन्नर, यशवंतनगर, खापराळे व फर्दापूर या ५ गावांना तसेच हिवरगाव, धुळवड, सुरेगाव, धोंडवीरनगर आणि धारणगाव या गावांच्या २० वाड्या - वस्त्यांचा समावेश आहे. ७ टँकरद्वारे या ५ गावे आणि २० वाड्यावस्त्यांची पाणी पुरवठ्याची गरज भासू शकते, असा अंदाज टंचाई कृती आराखड्यात व्यक्त करण्यात आला आहे.
समाधानकारक जलसाठ्यामुळे टंचाईची तीव्रता कमी
सिन्नर तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे धरणे - बंधाऱ्यांच्या जलसाठ्यात वाढ झाली. अजून पाणीसाठा मुबलक आहे. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाई जास्त जाणवणार नाही, उन्हाळा सुसह्य जाईल, असा अंदाज आहे. तथापि, उन्हाळ्याच्या शेवटी मे - जून महिन्यात टँकरची गरज भासल्यास पंचायत समितीच्या टंचाई कृती आराखड्यात तसे नियोजन करण्यात आले आहे. - मधुकर मुरकुटे, गटविकास अधिकारी, सिन्नर.
गतवर्षी १५ टँकरने ७ गावे आणि ७८ वाड्यांना पुरवठा
गतवर्षी तालुक्यात पावसाचे प्रमाण अल्प होते. त्यामुळे तालुक्यातील ७ गावे आणि ७८ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. त्यासाठी १५ टँकरची गरज भासली होती. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने यावर्षी सिन्नर तालुक्यात उन्हाळ्यात फारसी टँकरची गरज भासणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
समाधानकारक जलसाठ्यामुळे टंचाईची तीव्रता कमी
सिन्नर तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे धरणे - बंधाऱ्यांच्या जलसाठ्यात वाढ झाली. अजून पाणीसाठा मुबलक आहे. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाई जास्त जाणवणार नाही, उन्हाळा सुसह्य जाईल, असा अंदाज आहे. तथापि, उन्हाळ्याच्या शेवटी मे - जून महिन्यात टँकरची गरज भासल्यास पंचायत समितीच्या टंचाई कृती आराखड्यात तसे नियोजन करण्यात आले आहे. - मधुकर मुरकुटे, गटविकास अधिकारी, सिन्नर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.