आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रेकॉर्डब्रेक नफा; समृद्धीच्या धोरणानेे विश्वास वृद्धिंगत

शंकर वाघ | मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मामको बँकेत २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतरच सर्वसंमतीने झालेल्या कामकाजामुळे परस्पर विरोध व राजकारण संपुष्टात आले होते. रेकॉर्डब्रेक नफा, सभासदांना कोरोना व नोटबंदी काळात दिलेली सेवा, बँकेच्या विस्तारासाठी मालमत्तांची खरेदी, बँकेच्या वृद्धीची धोरणे या सर्व सकारात्मक निर्णयामुळे सभासदांचा विश्वास वाढला. त्यामुळे या वर्षी प्रथम पासूनच संचालकांची निवड अविरोध करण्यासाठी सभासदांचाही आग्रह होता. यात सर्व राजकीय, सामाजिक संघटनांच्या नेत्यांनी सहकार्य केले. मामको बँक संचालकांच्या अविरोध निवडीचे किंगमेकर ठरलेले राजेंद्र भोसले यांनी यामागची सबळ कारणे सांगतांना ही माहिती दिली.

बँकेच्या साठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच अविरोध निवडणूक झाली. प्रारंभी बेचाळीस हजार रुपयांच्या भाग भांडवलावर ही बँक सुरू झाली. सध्या ६४ हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या बँकेकडे २७३ कोटींच्या ठेवी आहेत. २२ हजार ७०० सभासद मतदार आहेत. संचालक मंडळाच्या अविरोध निवडीमुळे बँकेचा चाळीस लाख रुपयांचा निवडणूक खर्च वाचला आहे.बँकेत सर्व संचालक अविरोध निवडीच्या यशामागील कारणांची भोसले यांनी ‘दिव्य मराठी’शी चर्चा केली. ते म्हणाले, २०१७ च्या निवडणुकीत विरोधात असलेल्या पॅनलच्या नेत्यांची निवडणुकीनंतर भेट घेतली.

सर्व संमतीने कामकाज करण्याविषयी विनंती केली. त्यामुळे मागील पाच वर्षांत एकमताने बँकेचा कारभार झाला. फक्त बँकेच्या हिताला प्राधान्य दिले गेले. त्यामुळेच नोटबंदी काळात इतर बँकांसमोर रांगा असताना मामकोच्या शाखा पूर्णवेळ सुरू होत्या. एकही बनावट नोट मिळाली नाही किंवा दिली गेली.

कोरोना काळात देखील मामकोने अशीच सेवा दिली. कोरोना नंतर बँकेने छोट्या व्यावसायिकांना उभे करण्यासाठी बिनव्याजी कर्जाचे धोरण राबविले. देशभरात अर्थव्यवस्था बिकट झालेली असताना मामको बँक विक्रमी नफा मिळत होती. बँकेच्या दोन शाखांसाठी स्वमालकीची जागा खरेदी झाली. अशा कामकाज व धोरणांमुळे चालू वर्षी अविरोध संचालक मंडळ निवडून गेले पाहिजे, अशी सर्वांचीच भावना होती. इच्छुकांनी अर्ज भरले, मात्र ज्यांचा पॅनलमध्ये समावेश नसेल त्यांनी माघार घेण्याचे औदार्य दाखवले. इतर इच्छुकांना आपली भूमिका पटवून देण्यासाठी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नेते व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे निवडणूक टळली.

कर्जाच्या व्याजातून बँक चालवणे अवघड
सहकारी बँका या नफ्याच्या असाव्यात, मात्र नफेखोर नसाव्यात, असेच धोरण सहकार असते. केवळ कर्जदारांच्या व्याजावर बँक चालवणे अवघड असते किंवा तेच एक बँकेच्या नफ्याचे साधन ठरत नाही. रिझर्व बँकेच्या दिशानिर्देशानुसार मामको बँकेने सरकारी रोखे, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत चांगला नफा कमावला. इतर बँकांमध्येही गुंतवणूक केली.

ठेवीदारांच्या व्याजापेक्षा अधिक रक्कम मिळवण्यासाठी सातत्याने मार्ग शोधले. एकही पैसा बँकेत पडून न राहता चलनात आणून नफा कसा मिळू शकतो, यासाठी सातत्याने काम केले. त्यामुळे कर्ज वितरण कमी झाले किंवा वसुली कमी झाली तरी बँकेच्या नफ्याचा आलेख कमी झालेला नाही. असे भोसले यांनी बँकेच्या विक्रमी नफ्याचे रहस्य सांगितले.

बातम्या आणखी आहेत...