आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांची केली सुरक्षित वाहतूक:मालेगाव आगाराला शिवभक्तांच्या प्रवासातून 11 लाखाचे विक्रमी उत्पन्न

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासाठी धार्मिक पर्वणी ठरलेल्या पुण्य श्री शिवपुराण कथा प्रवचन आयाेजनामुळे मालेगाव बस आगारही मालामाल झाले आहे. कथा सप्ताह काळात भाविकांच्या प्रवासातून तब्बल ११ लाखाचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. २९ डिसेंबरच्या कथा समाप्ती दिवशी भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठी आगारातून ३५० बसेस साेडण्यात आल्याची माहिती आगारप्रमुख किरण धनवटे यांनी दिली.

शहरात २३ ते २९ डिसेंबर दरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथा प्रवचन आयाेजित करण्यात आले हाेते. कथेसाठी राज्याच्या कानाकाेपऱ्यातून भाविकांनी हजेरी लावली. भाविकांच्या उपस्थितीने प्रत्येक दिवशी गर्दीचे उच्चांक माेडले गेले. बाहेरहून येणाऱ्या भाविकांसाठी सर्व प्रकाराची व्यवस्था करण्यात आली हाेती. मालेगाव बस आगाराने ही धार्मिक पर्वणी साधून भाविकांना वाहतुकीची दर्जेदार सेवा दिली. कथेच्या पहिल्या दिवसापासूनच जादा बसेस सर्व मार्गांवर धावत हाेत्या.

हळूहळू गर्दी वाढू लागल्याने विभागीय वाहतूक अधीक्षक महाजन, वाहतूक अधिकारी कैलास पाटील हे नियाजेनकामी मालेगावात तळ ठाेकून हाेते. आगारप्रमुख किरण धनवटे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने दरराेज ३० ते ४० वाढीव फेऱ्यांचे नियाेजन करत दरदिवशीच्या उत्पन्नात दीड लाखाची वाढीव भर घातली. धुळे, जळगाव, पाचाेरा, चाळीसगाव, शिर्डी, नाशिक, अहमदनगर, पुणे आदी मार्गांवर जादा वाहतूक सुरु हाेती. सात दिवसात ११ लाखाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

अखेरच्या दिवशी लागली कसाेटी कथा संपताच भाविक परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाले. बहुतांश भाविकांनी बसच्या प्रवासाला पसंती दिली हाेती. त्यामुळे बसस्थानक गर्दीने तुंडूब भरले हाेते. उच्चांकी गर्दीमुळे आगाराच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कसाेटी लागली हाेती. काहिसे नियाेजन ढेपाळले असतानाही दुपारी १२ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ३५० बसेस मालेगाव आगारातून भाविकांना घेवून मार्गस्थ झाल्या. एकट्या धुळे मार्गावर १७५ बसेस साेडल्या गेल्या. धुळे, नाशिक, मनमाड, लासलगाव, नांदगाव, कळवण आगारातून १०५ वाढीव बसेस मागविण्यात आल्या हाेत्या.

बातम्या आणखी आहेत...