आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा वितरणावर परिणाम:लासलगाव-विंचूर सोळा गाव पाणी योजनेच्या दुरुस्ती कामाला सुरुवात

लासलगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासलगाव विंचूरसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्ती कामाला अखेर सुरुवात झाली आहे. नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यांमध्ये जलसाठा असतानाही केवळ जलवाहिणी नादुरुस्त असल्याच्या कारणाने पाणीपुरवठा वितरणावर परिणाम झाला होता. अखेर हे काम सुरू झाले आहे.माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून सुरुवातीला लासलगाव-विंचूर सह १६ गाव पाणी योजनेच्या दुरुस्ती करिता १३ कोटी रुपये मंजूर झाले होते. मात्र दर वाढल्याने पुन्हा निविदा प्रसिद्ध करावी लागल्याने अखेर २० कोटी रुपये त्यासाठी मंजूर झाले होते.

धरणात पाणीसाठा मुबलक प्रमाणात असतानाही जलवाहिनी जागोजागी फुटत असल्याने पाणीपुरवठा वितरणावर विपरीत परिणाम झाला होता परिणामी लासलगाव विंचूरसह परिसरातील गावांमध्ये तब्बल २५ ते ३० दिवस उशिराने पाणीपुरवठा प्रशासनाला करावा लागत होता, त्यामुळे नागरिकांमध्ये रोषाचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी पाणी मिळण्यासाठी नागरिकांना उपोषणे, आंदोलने करावी लागली होती. गत निवडणुकीत पाणीप्रश्न डोळ्यासमोर ठेवत निवडणुका लढल्या गेल्या होत्या अखेर आता हे काम पूर्णत्वास जाणार असल्याने पाण्यासाठी होणारे राजकारण तात्पुरता तरी थांबणार आहे.

बुधवारपासून या दुरुस्ती कामास सुरुवात झाली असून गुजरात राज्यातून नांदूरमध्यमेश्वर बंधारा परिसरात मोठ्या संख्येने पाइप आणण्यात आले आहे. या आणलेल्या पाइपचे पूजन १६ गाव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष, मुंबई बाजार समितीचे संचालक, सरपंच जयदत्त होळकर यांचे हस्ते झाले.

याप्रसंगी भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, जीवन प्राधिकरण विभागाचे प्रभारी उपअभियंता प्रताप पाटील, ठेकेदार काळे, उपसरपंच रामनाथ शेजवळ अफजल शेख, विंचूरचे सरपंच सचिन दरेकर, अनिल विंचूरकर, १६ गाव समितीचे सचिव, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, प्रफल्ल कुलकर्णी, पवन सानप, मयूर राऊत व मान्यवर यावेळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...