आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोजापूर धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांतील पिण्याच्या पाण्याची टंचाई मिटविण्यासाठी कालव्याला पूरपाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. याद्वारे १२ गावांतील सार्वजनिक नळ पाणीपुरवठ्यासाठी १२ बंधारे भरून देण्यात येणार आहेत. त्यामुळे या याेजनांना संजीवनी मिळणार असून लाभक्षेत्रातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येण्यास मदत हाेणार आहे.
गतवर्षी धरणात केवळ ५४ टक्के साठा झाला होता. त्यामुळे गतवर्षी धरणात पाणी कमी असल्याने आवर्तन मिळू न शकल्याने लाभक्षेत्रातील गावांना टंचाईचा सामना करावा लागला हाेता. यंदा मात्र जुलैमध्येच धरण ओतप्रोत भरले आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील गावांना भासणारी टंचाई पाहता पूरपाणी सोडण्याची मागणी होत होती. परिणामी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी आवर्तन सोडण्यात आल्यानंतर सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या जवळील बंधारे भरण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
सिन्नर तालुक्यातील या गावांना होणार लाभ
सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक, खंबाळे, भोकणी, दातली, पांगरी, नांदूरशिंगोटे, दुशिंगवाडी यांसह संगमनेर तालुक्यातल्या पिंपळे, सोनेवाडीसह पाच गावांना आवर्तनाचा लाभ होणार आहे. २४ जुलैला आवर्तन सोडण्यात आले. ३ नंबर चारीचे पाणी खंबाळे, ४ नंबर चारीचे निऱ्हाळे तर ५ नंबर चारीचे पाणी पिंपळे (ता. संगमनेर) शिवारापर्यंत पोहोचले आहे. सर्व चाऱ्यांच्या हेडला २२ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. तालुक्याच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणी पोहाेचण्यास विलंब होत आहे.
शेवटच्या टोकापासून बंधारे भरण्याची मागणी
कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेवटच्या टोकाला असलेले बंधारे पहिल्यांदा भरण्यास प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतू्न हाेऊ लागली आहे. काही ठिकाणी पाणी अडवण्याच्याही घटना घडू लागल्या आहेत. प्रशासनाने आवर्तनाचे नियोजन करावे. त्यामुळे पाणी मिळू शकेल याची शाश्वती लाभक्षेत्रातील गावांना येईल. फुलेनगर पाझर तलावात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आहे. या दृष्टीने प्रशासनाने नियाेजन सुरू केले आहे.
धरणात अद्यापही १००% साठा
धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून अजूनही १२५ क्यूसेक क्षमतेने आवक होत आहे. त्यामुळे धरण साठ्याची स्थिती १०० टक्के टिकून आहे. आवर्तनासाठी १४० क्यूसेक क्षमतेने पूरपाणी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत पावसाची उघडीप असली तरी अजून पावसाळा बाकी असल्याने आवर्तनाचा दीर्घकाळ लाभ होऊ शकेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.