आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदलते वातावरण:शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी गर्दी; संसर्गजन्य तापाने फणफणली मुले, सिन्नरला रुग्णसंख्येत दुपटीने वाढ

सिन्नर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदलत्या वातावरणामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या व्यक्ती संसर्गजन्य आजारांना बळी पडत आहेत. शासकीय आणि खासगी रुग्णालयात सध्या सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी या आजारांनी त्रस्त असणाऱ्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. यात बालकांचे प्रमाण लक्षणीय असल्याची माहिती सिन्नर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चेतन ठोंबरे यांनी दिली.

सध्या तापमान कमी-अधिक होत आहे. दुपारच्या वेळी कधी उकाडा, कधी पाऊस आणि रात्री पुन्हा थंडी असे विचित्र वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आजार बळावत असून सर्दी, खोकला आणि ताप असणारे रुग्ण घराघरांत दिसून येत आहेत.लहान मुलांची संख्या लक्षणीय असल्याने शाळांमध्येही मुलांच्या उपस्थितीवर परिणाम जाणवू लागला आहे. आजारपणातून बरे झाल्यानंतरही मुलांमध्ये विलक्षण अशक्तपणा दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना मुलांबाबत विशेष काळजी घ्यावी लागत आहे.संसर्ग लवकर आटोक्यात यावा, यासाठी नागरिकांनी त्रास अंगावर न काढता लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेणे गरजेचे आहे.

अशी घ्या मुलांची काळजी
स्वच्छतेच्या आणि राहणीमानाच्या सवयी बदलल्यास संसर्गजन्य आजार नक्कीच टाळता येऊ शकतो. त्यामुळे या दिवसांत उघड्यावरचे पदार्थ खाणे, बाहेरचे पाणी पिणे पूर्णपणे टाळले पाहिजे. घरचे सकस अन्न घेण्यास प्राधान्य द्या. बाहेरून आल्यानंतर लहान मुलांना आधी हात-पाय-चेहरा स्वच्छ धुवायला लावा. आईस्क्रीम किंवा अतिथंड पदार्थ, ज्यूस पिणे टाळा. आजारी व्यक्तींच्या संपर्कात लहान मुलांना येऊ देऊ नका. मुलांचा शाळेत नेण्याचा रुमाल, नॅपकिन रोजच्या रोज धुवून टाका. ताप आलेला असेल तरी मुलांना थोड्या थोड्या अंतराने पाणी देत रहा. जेवण जात नसेल तर सूप किंवा अगदी पातळ आहार द्या. व्हिटॅमीन सी असणारी फळे खायला दिल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होईल.

आजारी व्यक्तींनी इतरांपासून याेग्य अंतर राखावे
सर्दी, खोकला, ताप, अंगदुखीने त्रस्त असणाऱ्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे प्रत्येकानेच अगदी लहान मुलांनीही एकमेकांपासून योग्य अंतर पाळावे. घसादुखी, सर्दी असा त्रास सुरू होत आहे, हे लक्षात येताच कोमट पाणी प्यावे तसेच दिवसातून एक-दोनदा पाण्याची वाफ घ्यावी.
डॉ. भूषण साळुंके, बालरोगतज्ज्ञ, सिन्नर

बातम्या आणखी आहेत...