आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी घणाघात:देशातील मुसलमान राष्ट्रभक्त, मोदींची भूमिका लोकशाही, हिंदुत्वाला मारक; मालेगावात संजय राऊतांची टीका

मालेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

या देशातील मुसलमान हा राष्ट्रभक्त आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका लोकशाहीसोबतच हिंदुत्वालाही मारक ठरत आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली.

मालेगाव येथे उद्धव ठाकरे यांची उद्या रविवारी सभा होत आहे. सभेच्या तयारीसाठी संजय राऊत हे सध्या मालेगावातच मुक्कामी आहेत. सभेबाबत माहिती देताना त्यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपसह राज ठाकरे व नारायण राणेंवरही शेलक्या शब्दांत टीका केली.

उद्धव ठाकरे सर्वधर्मीयांचे नेते

संजय राऊत म्हणाले, मालेगाव येथे उद्धव ठाकरेंच्या सभेला मुस्लिम समाजही मोठ्या संख्येने येईल. हा देश सर्वांचा आहे. देशातील कुणालाही विरोध करण्याचे कारण नाही. या देशातील सर्व जातीधर्मीयांना शिवसेनेचे, उद्धव ठाकरेंचे नेतृत्व स्वीकारायचे आहे. उद्धव ठाकरे हे सर्वांना सांभाळून घेणारे नेते आहेत. त्यामुळे उद्या उद्धव ठाकरे यांच्या सभेला लाखाहून अधिक गर्दी होईल. मालेगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला होईल.

शिवसेनेचे खरे रुप मालेगावात दिसेल

संजय राऊत म्हणाले, शिवसेनेत झालेल्या गद्दारीमुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड चीड आहे. या संतापाचा उद्रेक उद्याच्या सभेत झालेला दिसेल. नियोजन एक लाख जणांचे केले असले तरी सभेचा उत्साह पाहता एक लाखाहून अधिक गर्दी होईल. मालेगावातील जनता उद्धव ठाकरेंना एकण्यासाठी, पाहण्यासाठी उत्सुक आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. तिचे खरे रुप उद्या मालेगावातील जनता पाहील.

मालेगावात उर्दूमध्ये बॅनर

उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी मालेगावात उर्दू भाषेत बॅनर लावण्यात आले आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की, उर्दूमध्ये बॅनर लावण्यात आक्षेप काय? उर्दू हीदेखील एक समृद्ध भाषा आहे. आम्ही किंवा बाळासाहेब ठाकरेंनी कधीही मुस्लिम किंवा उर्दू भाषेला विरोध केलेला नाही. राज ठाकरेंनी आपल्या सभेत जावेद अख्तरांचा दाखला दिला. ते जावेद अख्तर उर्दू भाषेत काव्य करतात. एवढच काय सर्वांचे लाडके गुलजारही उर्दू भाषेत लिहितात. त्यामुळे या भाषेला विरोध असण्याचे काहीच कारण नाही.

एकनाथ शिंदेंनी 5 आमदार निवडून आणावेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, आम्हाला खोकेवाले का बोलतात?, असा सवाल काल विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मात्र, त्यांनी केलेल्या गद्दारीमुळे केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांच्यावर थू केली जात आहे. त्यांनी केलेली बेईमानी जनतेला आवडलेली नाही. एकनाथ शिंदेंमध्ये खरेच हिंमत असेल तर त्यांनी आधी राजीनामा द्यावा व निवडणुकांना सामोरे जावे. एकनाथ शिंदेंनी स्वत:च्या हिंमतीवर 5 आमदार तरी निवडून आणावे. तेव्हा त्यांना खरी शिवसेना कोणती व खोकेवाल्यांची शिवसेना कोणती?, हे समजेल.

विरोधकांमध्ये उद्धव ठाकरेंची दहशत

संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदेंनी आमची ताकद चोरुन त्यांची ताकद वाढवली आहे. त्यामुळे प्रत्येक सभेत उद्धव ठाकरेंवर टीका केल्याशिवाय त्यांना काहीही बोलता येत नाही. राज ठाकरे यांना तर पक्ष स्थापन करुन 18 वर्षे झालेत. तरीही प्रत्येक भाषणात उद्धव ठाकरेंवर टीका केल्याशिवाय त्यांची कॅसेट पुढेच जात नाही. नारायण राणेंचेही तेच. कॅमेऱ्यासमोर आले की उद्धव ठाकरेंशिवाय त्यांच्याकडे दुसरा विषय नसतो. यावरुनच या नेत्यांच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल किती भीती आणि दहशत आहे, हे दिसते.

सध्याचे राजकारण दळभद्री

संजय राऊत म्हणाले, सध्या देशात आणि राज्यात दळभद्री राजकारण सुरू आहे. सत्ताधाऱ्यांना लोकशाहीवर अजिबात विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे तपास यंत्रणा व न्याय यंत्रणांचा वापर करुन विरोधकांना नष्ट करण्याचे काम केले जात आहे. देशात विरोधकांना त्यांचे स्थान मिळूच द्यायचे नाही, असे राजकारण सध्या सुरू आहे.

संबंधित वृत्त

भाजपवर हल्लाबोल:चोरांना चोर म्हटले, हा काय गुन्हा झाला?, देशात अमृतकाल नव्हे आतंककाल वाटावा, अशी स्थिती; ठाकरे गटाची टीका

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा भ्याडपणा मोदी सरकारने दाखविला आहे. चोरांना चोर म्हटले, हा काय गुन्हा झाला?, असा सवाल ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, पंतप्रधानांनी ज्या ‘अमृतकाला’चा उल्लेख केला त्या अमृतकालात रोज विषाचे फवारे उडत आहेत. न्यायालये, स्वातंत्र्य व लोकशाहीची मानहानी सुरू आहे. मोदीकाल हा अमृतकाल नसून हुकूमशाहीचा आतंककाल वाटावा अशी स्थिती आहे. वाचा सविस्तर