आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासप्तश्रृंगी गडावर सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी निघालेल्या दोन भाविकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सध्या चैत्र नवरात्रोत्सव सुरु आहे. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत आहेत. मात्र देवीचे दर्शन होण्याआधीच भाविकांवर काळाने घाला घातला आहे.
मृत्यू झालेल्या भाविकांमध्ये मालेगाव तालुक्यातील द्याने येथील भाविकाचा तर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नांद्रे येथील एका भाविकाचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. सप्तशृंगी देवी मंदिरातील चैत्री नवरात्रोत्सवाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. सप्तशृंगी मंदिरातील नवरात्रोत्सवाला रामनवमीपासून प्रारंभ होतो. तेव्हापासून आईच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागते.
कठडे नसलेल्या विहिरीत पडून मृत्यू
मालेगाव तालुक्यातील द्याने येथील सोमनाथ देवराम पबार हे मालेगाव-सटाणा रस्त्यावरील यशवंतनगर परिसरात रात्री विश्रांतीसाठी जागेचा शोध घेत होते. त्यावेळी धांद्री शिवारातील कठडे नसलेल्या विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला. पोलिस पाटील श्रीधर बागुल यांनी सटाणा पोलिसात घटनेची माहिती कळवली. सोमनाथ पबार यांच्यासोबत बॅग असल्याने मृतदेहाची ओळख पटवणे सोप्पे गेले.
मुख्य रस्ता वापरण्याचे आवाहन
दुसऱ्या घटनेत शेंबळी गावाजवळ पाचोरा तालुक्यातील नांद्रे येथील रहिवासी संभाजी भिवसन पाटील या यात्रेकरूचा रस्त्याच्या कडेला शेतात मृतदेह आढळला होता. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याचे दिसून आले. त्यांचा घात की अपघात यादृष्टीने तपास सुरू आहे. पोलिसांकडून भाविकांना मुख्य रस्ता वापरण्याचेच आवाहन करण्यात आले आहे. आडमार्गाने गेल्यास घातपाताची शंका व्यक्त केली जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.