आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहेलिकॉप्टरमधून हाेणारी पुष्पवृष्टी, तलवार बाजीची चित्तथरारक प्रात्यक्षिके, दांडपट्टा व विविध शस्त्र हाती घेत नागरिकांचे श्वास रोखून धरणारे विविध खेळ, भजनी मंडळ, अश्वारूढ शीख बांधव, अग्रभागी आकर्षक फुलांनी सजवलेला गुरुग्रंथसाहेब ग्रंथरथ, त्यामागे पंचप्यारे निशाण सनई व बँड पथक अशा थाटात रविवारी (दि. १८) सायंकाळी सालाना जोडमेला व गुरू गोविंदसिंग गुरुगादी स्मृतिदिनानिमित्त मनमाडला शीख बांधवांनी शोभायात्रा काढली. यावेळी जाे बाेले साे निहाल, सत्श्री अकाल चा जयघाेेष करण्यात आला.
अमृतसर, नांदेड खालोखाल शीख धर्मांचे प्रमुख स्थान असलेल्या मनमाड येथील गुरुद्वारा गुपतसर अर्थात मनमाड गुरुद्वारात रविवारी श्री गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या ३५६ व्या पवित्र प्रकाश पर्वा निमित्त सालाना जोडमेला उत्साहात साजरा झाला.
यानिमित्त देश व विविध राज्यातून तसेच महाराष्ट्रातील विविध भागातून हजारोंवर शिख बांधवांनी हजेरी लावली. दुपारी शहराच्या विविध भागातून शोभायात्रा काढण्यात आली. दोन वर्ष कोरोनामुळे शोभायात्रेवर निर्बंध होते, यंदा मात्र सर्वच कार्यक्रमात अभूतपूर्व उत्साह दिसून आला. तीन दिवसांपासून येथील गुरुद्वारात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. संपूर्ण मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला.
रविवारी दुपारी सनई, चौघडा, नगारा, भजनी पथक, धार्मिक गीते, फुलांनी सुशोभित चित्ररथात पवित्र गुरुग्रंथसाहेब, गुरू गोविंदसिंग यांची प्रतिमा व त्यापुढे पंचप्यारे, पंचनिशाण समोर सतनाम वाहे गुरू, जो बोले सो निहाल.. सत् श्री अकालचा जयघोष करणारे हजारो शीखबांधव, महिला असे या मिरवणुकीचे स्वरूप होते. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी भाविकांचे स्वागत व अल्पोपाहार आदींची व्यवस्था होती. राष्ट्रीय पुरुषांच्या पुतळ्यांना बाबा नरेंद्रसिंग यांनी पुष्पहार अर्पण केले. विविध पक्ष, संघटना, कार्यकर्ते व भाविकांनी फुले उधळीत यात्रेचे स्वागत केले व पवित्र गुरू ग्रंथसाहेब गुरूगादीचे दर्शन घेतले.
तत्पूर्वी या सालाना जोडमेलानिमित्त गुरुद्वारात ३ दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड पाठाची समाप्ती झाली. रविवारी पहाटे गुरुवाणीने या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर देशाच्या विविध भागातून आलेल्या भजनी मंडळांनी आपली सेवा सुरू केली. दिवसभर महाप्रसाद लंगरचा भव्य कार्यक्रम झाला. त्यात सर्वधर्मीय भाविक सहभागी झाले होते. नांदेड येथील संत बाबा नरिंदरसिंगजी यांच्या मार्गदर्शनाखाली बाबा बलविंदरसिंगजी यांच्या उपस्थितीत मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजीतसिंगजी यांनी या सर्व कार्यक्रमांचे संयोजन केले. रविवारी सकाळपासूनच मनमाड गुरुद्वाराचा परिसर भाविकांनी गजबजून गेला. तेथे यात्राही भरली होती. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली गुरुद्वारा मंदिरावर आकर्षक रोषणाई व सजावट करण्यात आली होती. कीर्तन व प्रवचन कार्यक्रम झाले. या उत्सवानिमित्त सर्व धर्मीय नागरिकांनी गुरुद्वारात दर्शन घेऊन सर्व शीख बांधवांना शुभेच्छा दिल्या.
हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
दत्तमंदिर रोडवरून निघालेल्या शीख धर्मीयांच्या या शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करण्यासाठी खास नवी दिल्लीहून मागविण्यात आलेले हेलिकॉप्टर हे प्रमुख आकर्षण ठरले. मिरवणूक मार्गावर व चौका -चौकात त्यावरून या शोभायात्रेवर पुष्पवृष्टी झाली. सुमारे एक लाख अकरा हजार रूपये यासाठी धार्मिक कार्यक्रमासाठी सवलत म्हणून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.