आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदोबस्त:मनमाड रेल्वेस्थानक प्रवेशद्वाराजवळ बंदोबस्त; दुसरे गेट बॅरिकेड्स लावून बंद

मनमाड8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेविरोधात देशाच्या काही राज्यांत युवकांकडून विरोध आंदोलन होत आहे. या आंदोलनात प्रामुख्याने रेल्वे संपत्तीला लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी मनमाड रेल्वेस्थानकात पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाचा सशस्त्र बंदोबस्त तैनात होता.

सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने स्थानक परिसरात पथसंचलन केले. रेल्वेस्थानकात अनधिकृत प्रवेश होऊन कोणतेही आंदोलन होऊ नये, यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज असून सुरक्षा यंत्रणांनी रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याच अनुषंगाने येथील रेल्वे पार्सल विभागासमोरील रेल्वेचे एक मुख्य प्रवेशद्वार बॅरिकेड‌्स लावून बंद केले होते.

त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक एस. एस. ढेंगे व लोहमार्ग पोलिस निरीक्षक शरद जोगदंड सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. रेल्वे फलाटांवरही गस्त वाढविण्यात आली आहे. स्थानकाच्या प्रवेशद्वारावर सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या रेल्वेस्थानक परिसरात दिवसरात्र गस्त कडक करण्यात आली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तीन-चार दिवसांपासून रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. काही गाड्या रद्द केल्या आहेत. काही गाड्या विलंबाने धावत आहेत. बिहारकडून येणाऱ्या पाटलीपुत्र, वॉस्को, मुझफ्फरपूर पवन एक्स्प्रेस, भागलपूर एक्स्प्रेस, जनता एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या असून येणाऱ्या अनेक गाड्या उशिराने धावत आहेत.

बातम्या आणखी आहेत...