आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शेतकऱ्यांना अपेक्षित कांद्याबद्दल आणि जबाबदार असलेल्या केंद्र, राज्य सरकारच्या धोरणाबद्दल शब्द न काढल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. सध्या कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये शासनाबद्दल असंतोष आहे. अशा परिस्थितीत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे कांद्याचे आगार असलेल्या तालुक्यात पुतळा अनावरण सोहळ्यासाठी आल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाने हजेरी लावली.
यावेळी पालकमंत्री दादा भुसे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रा. यशवंत गोसावी यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. तर युवराज संभाजीराजे यांनी राजकारण्यांना शेतकऱ्यांचा विसर पडल्याचा आरोप करत कांद्याचा वांदा सोडविण्यासाठी कांद्याला हमीभाव देऊन कांदा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची विनंती केली. यामुळे कांद्याच्या एकंदर व्यावसायिक व राजकीय परिस्थितीबद्दल सखोल माहिती आणि अभ्यास असणारे माजी केंद्रीय कृषीमंत्री कांद्याबद्दल सध्याच्या शासनाच्या धोरणावर बोलतील ही उत्सुकता शेतकऱ्यांना होती. मात्र पवारांनी कांद्याबद्दल एकही शब्द न बोलता, पुतळ्याचे अनावरण झाल्याचे सांगत पगार द्वयींचे अभिनंदन करून फक्त दोन मिनिटांत आपले भाषण संपवून काढता पाय घेतला. यामुळे उपस्थित कांदा उत्पादकांचा हिरमोड झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.