आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढिसाळ कारभार:सिन्नर आगाराला राेज सहा लाखांचे उत्पन्न, मात्र पिण्यासाठी पाणीच नाही

सिन्नर / भरत घोटेकर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘हायटेक’ बसस्थानक अशी ख्याती असलेल्या सिन्नर आगाराचे उत्पन्न दिवसाकाठी ६ ते ७ लाख रुपयांचे, १२ ते १५ हजार प्रवाशांची दिवसभरात येथे वर्दळ असते. मात्र या बसस्थानकात दोन महिन्यांपासून पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने हजारो प्रवाशांसोबतच ४५० कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जलवाहिनी तुटल्याने पाणीपुरवठा खंडित झाला असून दोन महिन्यांपासून दुरुस्ती करण्यासाठी आगाराला मुहूर्त सापडत नसल्याने ढिसाळ कारभाराचा अजब नमुना समोर आला आहे.

बसस्थानकाच्या प्रवेशद्वारा-जवळूनच गॅस कंपनीची पाइपलाइन टाकण्यात आली‌ आहे. दोन महिन्यांपूर्वी या जलवाहिनीसाठी खोदकाम करताना नगरपालिकेच्या जलवाहिनीला जोडलेली येथील बसस्थानकाची पाणीपुरवठा लाइन तुटली गेली. तेव्हापासून आजतागायत येथील पाणीपुरवठा खंडित झाला आहे. दोन महिन्यांपासून बसस्थानकात पाण्याची कुठलीही पर्याय व्यवस्था करण्यात आली नाही. तुटलेली जलवाहिनी दुरुस्तसाठी आगाराकडून पावले उचलली गेली नाही. प्रवाशांना बसस्थानकात उतरल्यावर पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने ते नियंत्रण कक्षात येऊन जाब विचारतात.

हायटेक बसस्थानकाची निगा राखण्यात प्रशासन अपयशी
बसस्थानकात रेल्वे स्टेशनच्या धर्तीवर हायटेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. शुद्ध पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही, बसगाड्यांची आगमन - गमनाची डिजिटल उद्घोषणा या सर्व व्यवस्था स्थानकात बस थांबताच प्रवाशांना भुरळ घालत होत्या. मात्र सध्या यापैकी कुठलीही व्यवस्था येथे सुस्थितीत राहिली नाही. किंबहुना बसस्थानक सुस्थितीत ठेवण्याची तसदीही आगार प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे परिसरात कमालीची अस्वच्छता पसरली आहे.

दुरुस्तीसाठी पाठपुरावा
तुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी नगरपालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. कर्मचारी नगरपालिकेत पाठवला होता. दुरुस्ती करून पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल. -भूषण सूर्यवंशी, आगार व्यवस्थापक

बातम्या आणखी आहेत...