आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिन्नरकर नव्या जोमाने पुन्हा गुंतले व्यवसायात:सिन्नरला महापुराचे नुकसान पचवत व्यवसाय सुरू ; भाजी बाजारही पूर्ववत

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सरस्वती नदीच्या महापुराने वाहून आलेला गाळ व्यावसायिकांनी दुकानातून बाहेर काढत स्वच्छता केली आहे. पुराचे पाणी दुकानांमध्ये घुसून झालेले काेट्यवधी रुपयांचे नुकसान पचवत सिन्नरकर पुन्हा नव्या जोमाने व्यवसायात गुंतले आहेत. रविवारी (दि.४) भैरवनाथ मंदिरासमोरील, भाजी बाजार कॉम्प्लेक्स परिसरातील आणि नेहरू चौकातील नगरपालिकेच्या सर्व गाळ्यांमधील व्यावसायिकांनी आपापली दुकाने उघडून व्यवसाय सुरू केल्याचे दिसून आले. आठवडे बाजाराच्या निमित्ताने येथील भाजी बाजारही पूर्ववत सुरू झाला.

नगरपालिकेकडून शुक्रवार, शनिवार अशी दोन दिवस स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. रविवारीही काही भागात जेसीबीच्या माध्यमातून सरस्वतीच्या पुरात वाहून आलेला गाळ दूर करण्याचे काम सुरू होते. मात्र, बहुतेक दुकानातील गाळ काढण्याचे काम तसेच खराब झालेला माल बाहेर टाकला जात असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर अजूनही कचऱ्याचे ढिगारे नजरेस पडत आहेत. झालेले नुकसान पचवून या सर्वच व्यावसायिकांनी रविवारी आपली दुकाने उघडे ठेवून पुन्हा नव्या दमाने सुरुवात केल्याचे दिसून आले. नदीकाठी घरे पडल्यामुळे संसार उघड्यावर आलेल्या नागरिकांना अद्यापही सरकारी मदतीची प्रतीक्षा कायम असून त्यांच्याकडून पुनर्वसनाची अपेक्षा व्यक्त हाेत आहे.

पडक्या वेशीतील पुलावर पादचारी पुलाची मात्रा...
भिकुसा कॉम्प्लेक्ससमोरून पडक्या वेशीत जाणारा पूल देव नदीच्या महापुरात वाहून गेला आहे. त्यामुळे येथील नागरिकांची झालेली गैरसोय दूर करण्यासाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी स्वखर्चातून तेथे लोखंडी पादचारी फुल उभारला आहे. रविवारी दुपारपर्यंत त्याचे काम पूर्ण झाल्याने या भागातील नागरिकांना सिन्नर बस स्थानकाकडे येण्यासाठी होणारी गैरसोय दूर झाली आहे. उदय गोळेसर, बाळासाहेब शिंदे, अवधूत आव्हाड यांनी घटनास्थळी उभे राहून राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली या पुलाचे काम पूर्ण करून घेतले.

कोट्यवधी रुपयांचे नुकसान : गुरुवारी (दि.१) रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शहरातील १९५ दुकाने आणि १६४ घरांचे नुकसान झाले आहे. सिन्नर नगरपालिका आणि महसूल विभागाच्या वतीने सुरू असलेले नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात आले असून या महापुरात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...