आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सिन्नर नं. 1 शाळेची डिजिटलकडे वाटचाल; शिक्षकांच्या दातृत्वातून दोन तुकड्यांसाठी दोन अँड्रॉइड टीव्हीची खरेदी

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलांना डिजिटल शिक्षण मिळावे ही शिक्षकांची इच्छा असूनही शाळेत त्यासाठी राबवायची यंत्रणा उपलब्ध नसल्याने शिक्षकांची अडचण होते. मात्र, या समस्येवर मात करण्यासाठी सिन्नर नं. १ शाळेतील सर्व शिक्षकांनी पदरमोड करून, स्वतः वर्गणी काढत दोन तुकड्यांसाठी दोन अँड्रॉइड टीव्ही खरेदी केले. यापूर्वी ९ तुकड्या विविध सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून डिजिटल करण्यात आल्या होत्या. त्यात भर घालून शिक्षकांनी आणखी दोन‌ वर्गात साहित्य बसवले. आता शाळेतील सर्व ११ तुकड्या डिजिटल झाल्या आहेत.

गटशिक्षणाधिकारी मंजूषा साळुंखे, केंद्रप्रमुख बाळासाहेब फड, मुख्याध्यापक प्रवीण देवरे, शिक्षक राजेंद्र शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मनोहर आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील सर्व शिक्षकांनी शाळा डिजिटल करण्यासाठी कंबर कसली आहे. शिक्षणाचा पाया मानल्या जाणाऱ्या प्राथमिक शाळेत ई - लर्निंगचे धडे देऊन सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी धडपडणाऱ्या प्राथमिक शिक्षकांचे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.सिन्नर शहरातील सिन्नर नं.१ ही एकमेव जिल्हा परिषदेची शाळा. झोपडपट्टी भागातील, मोल मजुरी करणाऱ्या पालकांची मुले या शाळेत शिक्षण घेतात.

या गरिबांच्या मुलांना डिजिटल शिक्षण मिळावे, आधुनिक तंत्रज्ञान माहित व्हावे या उद्देशाने शिक्षकांनी नुकतेच रोटरी क्लब ऑफ सिन्नरकडून एक आणि सेवानिवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी रामभाऊ वायफळकर यांच्याकडून एक असे २ अँड्रॉइड टीव्ही शाळेत भेट मिळाले. शाळेत ११ तुकड्यांपैकी ९ तुकड्या डिजिटल झाल्या खऱ्या परंतु अजूनही दोन तुकड्यांचा प्रश्न प्रलंबित होता. त्यातून मार्ग काढण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी पदरमोड करून स्वतः वर्गणी काढून उर्वरित दोन तुकड्यांसाठी दोन अँड्रॉइड टीव्ही खरेदी केले.

आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून शिक्षकांनी दिलेले योगदान शहरासह परिसरात कौतुकास्पद ठरले आहे. यापुढेही लोकसहभाग व समाज सहभागाच्या माध्यमातून शाळेत अधिकाधिक सोईसुविधा उपलब्ध करण्याचा मानस येथील शिक्षकांनी व्यक्त केला. सिन्नर शहरातील जिल्हा परिषदेची एक सुसज्ज अशी डिजिटल शाळा नावारूपास येत आहे.याकामी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र शेजवळ, वंदना भडांगे, विलास ढोबळे, मनोहर आव्हाड, मोहिनी इंगळे, सुनीता बुवा, प्रकाश दावले, सुनील शिंदे, वंदना मुंढे, अश्विनी पाटील, जयश्री गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...