आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संताप:सिन्नर-शिर्डी चौपदरीकरणामुळे सहा गावांसह साई पालख्यांची वाट बिकट; वावी पोलिस ठाणे, आरोग्य केंद्रात जाण्यासाठी घालावा लागणार वळसा

भरत घोटेकर | सिन्नर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - शिर्डी महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात वावीजवळ उभारल्या जाणाऱ्या पुलाजवळ दुभाजक टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वावी पोलिस ठाणे, वीज वितरण कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्रासह घोटेवाडी, कहांडळवाडी, फुलेनगर, निऱ्हाळे, वल्हेवाडी दुशिंगपूर, चिंचोली या गावांसह पालखी मार्गाने जाणाऱ्या साई भक्तांची ‘वाट’ बिकट झाली आहे. वावी गावातील पुलाला वळसा घालून मुख्य पेठेतून या गावातील नागरिकांना प्रवास करावा लागणार असल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या नियोजनाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. या रस्त्याचे दुभाजक खंडित करून पुलाच्या मागे साईभक्त निवारा केंद्राजवळ ब्लिंकरची व्यवस्था करण्याची मागणी परिसरातील गावांकडून होत आहे.

सिन्नर-शिर्डी या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम कासवगतीने सुरु आहे. वावी व पांगरी येथे भराव टाकून उड्डाणपूल सुरू असल्याने या दोन महत्त्वपूर्ण गावांची बाजारपेठ उद्धवस्त झाली आहे. त्यातच उड्डाणपुलाखालून पाहिजे तेवढे अंडरपास न दिल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. त्यात सिन्नरकडून वावी गावाकडे जाताना अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या वावी फाट्याजवळ साईभक्त निवासजवळ असलेला गावात जाणारा महत्त्वपूर्ण रस्ताच बंद करण्याचे काम सुरू आहे. या रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर दुभाजक टाकण्यात आल्याने या मार्गाने भविष्यात प्रवास करता येईल की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

उड्डाणपुलाच्या मागे मार्ग देण्याची गरज
साईभक्त निवासजवळ दुभाजक टाकून रस्ता बंद केला जात असल्याने आता उड्डाणपुलाच्या धोकादायक वळणावर गावात जाण्यासाठी रस्ता सोडणार का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. त्यामुळे भविष्यातील अपघाताचे धोके टाळण्यासाठी पुलाच्या मागे काही अंतरावर साईभक्त निवासासमोर सोलर ट्रॅफिक ब्लिंकर टाकून मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.

रस्ता न सोडल्यास आंदोलन
पोलिस ठाणे, वीज वितरण कंपनी आणि इतर सहा गावांकडे जाण्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. मात्र, याठिकाणी महामार्गावर दुभाजक टाकून रस्ता अडवला जात असल्याचे दिसते. वावी पोलिस ठाण्यासह या गावांना जाण्यासाठी रस्ता ठेवावा अन्यथा ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करावे लागेल.
विजय काटे, माजी सरपंच, वावी

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रस्त्याचे डिझाइन
रस्ता सुरक्षेचा विचार करून सिन्नर - शिर्डी महामार्गाचे डिझाइन बनवण्यात आले आहे. त्यानुसारच कामकाज सुरू आहे.‌ प्रत्यक्ष जागेवर जात पाहणी करून हा रस्ता खुला करायचा किंवा नाही या संदर्भात निर्णय घेण्यात येईल.
दिलीप पाटील, प्रबंधक-राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

शेतकऱ्यांची गैरसोय होणार
घोटेवाडी, कहांडळवाडी, चिंंचोली, फुलेनगर, वल्हेवाडी, निऱ्हाळे, दुशिंगपूर या गावातील शेतकऱ्यांचा शेतमाल नाशिककडे जातो. वावी गावात पोलिस ठाण्याकडे जाणारा सदर मार्ग दुभाजक टाकून बंद केला जात असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाण्यासाठी वावीच्या बाजारपेठेतून जावे लागेल. उड्डाण पुलाखालून गावातील बाजारपेठेतून ही अवजड वाहतूक वळविणार का असा प्रश्न ग्रामस्थ व वाहनचालकांकडून विचारला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...