आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घंटागाडी:ग्रामपंचायतीला घनकचऱ्याचे व्यवस्थापन; चलार्थ पत्र मुद्रणालयाच्या सामाजिक दायित्व निधीतून पंचाळेला घंटागाडी

सिन्नर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड येथील चलार्थ पत्र मुद्रणालयाच्या सामाजिक दायित्व निधीतून पंचाळेकरिता घंटागाडी देण्यात आली. शिवसेनेचे युवानेते राजेश गडाख, ग्रामपंचायत सदस्य महेश थोरात यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. यामुळे ग्रामपंचायतीला घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे सोयीचे होणार आहे.

खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले. मुद्रणालयाच्या अध्यक्षा तृप्ती पात्रा घोष, निर्देशक एस. के. सिन्हा, अजय अग्रवाल, मुख्य महाप्रबंधक राजेश बन्सल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदी उपस्थित होते. सरपंच उषा थोरात, उपसरपंच प्रकाश थोरात, सदस्य महेश थोरात, ग्रामसेवक प्रमोद शिरोळे, लिपिक रामनाथ थोरात, बाळासाहेब थोरात, सुनील थोरात, अरुण थोरात, संजय दवंगे आदींनी घंटागाडीचा स्विकार केला.

वर्षभरापासून पाठपुरावा
ओल्या व सुक्या कचऱ्याचे नियोजन करणे, कचरा गोळा करताना व्यवस्थापन, कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लागावी यासाठी सर्व सुविधांनी युक्त घंटागाडी उपलब्ध करणे गरजेचे होते. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते राजेश गडाख, सदस्य महेश थोरात यांनी प्रस्ताव तयार
करण्यापासून वेळोवेळी स्मरणपत्र देणे, वारंवार बैठकीत वर्षभरापासून पाठपुरावा केला. अखेर गावाला घंटागाडी उपलब्ध झाली आहे.

एक टन कचऱ्याची रोज विल्हेवाट
१५ व्या वित्त आयोगातून घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी सूचित केले आहे. त्याअंतर्गत गावात कचराकुंड्या असूनही कचरा उचलण्याची व्यवस्था नव्हती. आता ही गैरसोय दूर झाल्याने रोज एक टन कचऱ्याची विल्हेवाट लावणे सोयीचे होणार आहे. कचऱ्यातून खतनिर्मितीचे धोरण आखण्यात येणार असल्याची माहिती सदस्य महेश थोरात यांनी दिली. घनकचरा व्यवस्थापना संबंधित केंद्र व राज्य सरकारच्या योजना खासदार गोडसे यांच्यामार्फत राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...