आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत ही मधुमेहची जागतिक राजधानी बनत आहे. बैठी जीवनशैली, आनुवंशिकता, वेदनाशामक गोळ्यांचे सेवन, कीटकनाशक वापरलेला भाजीपाला व फळे, व्यायामाचा अभाव तसेच तणाव हे मधुमेहाचे प्रमुख कारण आहे. आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा स्वीकार केल्यास मधुमेह नियंत्रणात राहू शकतो, असे विचार येथील सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. उज्ज्वल कापडणीस यांनी व्यक्त केले. येथील ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सभागृहात ‘उतारवयातील मधुमेह’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. आर. हिरे होते. डॉ. कापडणीस यांनी माझ्या आरोग्याची जबाबदारी ही माझी आहे, असे समजून सजगतेने जगणे गरजेचे आहे. दिवसा डोक्यात येणाऱ्या अगणित विचारांपैकी ८० ते ९० टक्के विचार हे व्यर्थ असतात. ते भूत-भविष्याशी निगडित असतात. त्यामुळे वर्तमानात जगण्याची सवय लावून घेतली पाहिजे. नकारात्मक विचारामुळे अनेक रोग निर्माण होत असल्याचे डॉ. कापडणीस म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार भगवान बागूल यांनी डॉ. कापडणीस यांच्या संगीतमय योगाचा परिचय दिला. श्यामलाल रोहिदास यांनी आभार मानले.
साखरेची पातळी तपासा
सकाळची उपाशीपोटी साखर सर्वसामान्य निरोगी व्यक्तीस १०० पेक्षा कमी असावी. तर मधुमेह व्यक्तींना ते ११० ते १२० पेक्षा कमी असावी. ६० पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीस उपाशी पोटी साखर १३० पर्यंत असावी. जेवणानंतरची साखर निरोगी व्यक्तीस १४० पेक्षा कमी असावी. तर मधुमेह झालेल्या व्यक्तीची २०० पेक्षा कमी असावी. एचबी वन सी सातपेक्षा कमी असावी. यासाठी प्रयोगशाळेत साखरेची तपासणी करण्याचा सल्ला डॉ. कापडणीस यांनी दिला.
अशी घ्यावी आराेग्याची काळजी
मधुमेही रुग्णांनी डोळे व किडनी तपासणी (क्रियेटिन लेव्हल) दर सहा महिन्यांनी तपासले पाहिजेत. मधुमेही प्रशिक्षण, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे, आरोग्यदायी सवयी, नियमित व्यायाम व औषधोपचार याने मधुमेह नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. एवढेच नव्हे तर त्याच्या गोळ्याही बंद करता येऊ शकतात. आहारात डाळिंचे प्रमाण, मोड आलेल्या धान्याचे प्रमाण प्रथिने योग्य प्रमाणात असावित. दररोज तीन ते चार ग्रॅम एवढेच मीठ घ्यावे. पापड, लोणचे यामुळे मिठाचे प्रमाण वाढते. म्हणून मधुमेही व्यक्तीने मिठाचा वापर जपून करावा. दरवर्षी लिपीड प्रोफाइल एकदा तरी तपासावे, अशा विविध टिप्स यावेळी देण्यात आल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.