आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंपकाळातील नुकसान भरून काढण्यासाठी एस. टी. महामंडळाने कंबर कसली आहे. शक्य त्या पद्धतीने प्रवासी वाढवून उत्पन्नात भर घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांच्या गर्दीची सहा ठिकाणे ‘फोकल पॉइंट’ म्हणून निश्चित करण्यात आली आहे. या प्रत्येक पॉइंटवर दोन सत्रात स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करून बसेस थांबवून प्रवाशांना बसवून दिले जात आहे. मागील आठवडाभरात तब्बल हजार प्रवाशांना फोकल पॉइंटवरून विविध ठिकाणी मार्गस्थ करत सुमारे दोन लाखांचे अतिरिक्त उत्पन्न मिळविल्याची माहिती आगारप्रमुख किरण धनवटे यांनी दिली.
गतवर्षी नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झालेला एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप २२ एप्रिल २०२२ ला मिटला. कर्मचारी कर्तव्यावर परतल्याने लालपरीची चाके वेगाने धावू लागली आहे. संप तब्बल सहा महिने सुरू होता. परिणामी प्रवासीवर्ग एस. टी. सेवेपासून काहीसा दुरावल्याचे चित्र होते. मात्र, एस. टी. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुन्हा प्रवाशांच्या मनात एक विश्वास निर्माण केला आहे. सुरक्षित प्रवासाच्या हमीमुळे प्रवाशांची बसेसला पहिली पसंती आजही मिळत आहे. प्रवाशांचा विश्वास टिकवून ठेवत त्यांची गैरसोय टाळण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी होत आहे.
याचाच एक भाग म्हणून प्रवाशी गर्दीच्या सहा फोकल पॉइंटवर लक्ष देण्यात आले आहे. नाशिक, शिर्डी, पुणे, नांदगाव, औरंगाबाद, धुळे, चाळीसगाव, सटाणा आदी ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी बसस्थानकांवर न येता फोकल पॉइंटवर उभे राहून बसेसची प्रतीक्षा करतात. बऱ्याचदा चालक या ठिकाणी बसेस थांबवत नाही. त्यामुळे प्रवासी खासगी वाहनांनी निघून जातात. याचा फटका महामंडळाला बसत असल्याचे लक्षात आल्याने फोकल पॉइंटवर कर्मचारी नियुक्त केले आहे. हे कर्मचारी थांब्यावरील सर्व प्रवाशांना बसेसमध्ये बसवून बस क्रमांक तसेच प्रवासी संख्या आपल्या रजिस्टरमध्ये नमूद करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.