आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराला सद्या चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात अाहे. त्यामुळे येवलेकरांना रोज पाणी मिळावे, शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्याने वाढलेल्या वसाहतींचा अभ्यास करून भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेत अमृत २ अभियानातून येवला नगरपरिषदेच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनास सादर करावा, अशा सूचना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
भुजबळ यांच्या नाशिक येथील संपर्क कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, दिलीप खैरे यांच्यासह या योजनेचे सल्लागार आणि अधिकारी उपस्थित होते. भुजबळ म्हणाले की, शहराला सद्या चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने येवलेकरांना रोज पाणी मिळाले पाहिजे. शहराची लोकसंख्या साधारणतः ७० हजार आहे. शहरातील अस्तित्वातील पाणीपुरवठा योजना २०१३ मध्ये पूर्ण झालेली आहे. मात्र, त्यानंतर शहराची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नव्याने निर्माण झालेल्या नागरी वस्तीमुळे या पाणीपुरवठा योजनेवर ताण निर्माण झाला आहे.
पालखेड डावा कालवा उद्भव असलेल्या शहर पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावाची क्षमता कमी पडत असल्यामुळे शहराला कधी कधी तर ५/६ दिवसाआड पाणी दिले जाते. शहर पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावाची क्षमता वाढवणे किंवा नवीन साठवण तलाव निर्माण करणे, शहरातील सर्व घरांना नळ जोडणी देण्याकरिता वाढीव कुटुंबासाठी व नव्याने निर्माण झालेल्या वसाहतींसाठी अंतर्गत वितरण व्यवस्था निर्माण करणे, नादुरुस्त जलवाहिन्या बदलणे, पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेत सुधारणा करणे, या कामांचा वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये समावेश करावा अशा सूचना त्यांनी दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.