आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील कोरोना रुग्ण नियंत्रणांचा शास्त्रीय शोध घेण्यासाठी ऑपरेशन ‘मालेगाव मॅजिक’ राबविले जात आहे. पहिल्या टप्प्यातील सर्व्हेत ९६ टक्के व्यक्तींमध्ये १०० टक्के सक्षम रोगप्रतिकारशक्ती आढळून आली होती. आता सर्व्हेचा दुसरा टप्पा शुक्रवार (दि. १३) पासून सुरू होत आहे. या सर्व्हेत पुन्हा २७३५ जणांच्या रक्ताचे नमुने घेत अर्जाद्वारे माहिती संकलन केली जाणार आहे. सर्व्हेसाठी २२ पथकांची नियुक्ती केली असून यात मेडिकल, युनानी, होमिओपॅथी व आयुर्वेदिक या चार पॅथींच्या तज्ज्ञांचा समावेश आहे.
पहिल्या लाटेत मालेगाव शहर कोविडचे हॉटस्पॉट ठरले होते. मात्र, दुसऱ्या व तिसऱ्या लाटेत कोविड बाधितांची संख्या नियंत्रणात होती. हॉटस्पॉटनंतर कोविड उपचार पॅटर्नही चांगलाच चर्चेत आला होता. कोविड नियंत्रणाचा शास्त्रीय शोध घेण्यासाठी शासनाने आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मदतीने ऑपरेशन ‘मालेगाव मॅजिक’ हाती घेतले आहे. जानेवारी महिन्यात पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करत २७३५ जणांचे रक्तनमुने संकलित केले होते. सक्षम रोगप्रतिकारशक्तीमुळे कोविडला ब्रेक लागल्याचे पहिल्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. आता तीन महिन्यांनंतर पुन्हा त्याच व्यक्तींपर्यंत पोहोचून दुसऱ्या टप्प्याचा सर्व्हे केला जाणार आहे. याकामी २२ पथके तयार केली असून एका पथकात पाच जणांचा सहभाग राहिल. बुधवारी मनपा सभागृहात आरोग्याधिकारी डॉ.सपना ठाकरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अलका भावसार यांनी पथकप्रमुखांची बैठक घेतली. त्यांना १८ ते ४५, ४५ ते ६० व ६० वर्षांपुढील व्यक्ती अशा तीन गटांत रक्ताचे नमुने घ्यावेत, एक माहिती अर्ज भरून घेत ३१ मेपर्यंत सर्व्हेचे काम संपविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.