आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियाेजन:जगदंबा मातेचे मंदिर राहणार 24 तास खुले; 32 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

येवला8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कोटमगाव येथील श्रीमहाकाली, श्रीमहासरस्वती व श्रीमहालक्ष्मी या तीन रूपांत असलेल्या जगदंबा माता मंदिरात वर्षानुवर्षाची परंपरा असलेल्या येथील यात्रेत यंदा तीन हजारांवर भाविक घटी बसणार आहेत. यात्रा काळात भाविकांच्या सोयीसाठी २४ तास मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे. मंदिर परिसरात सुरक्षेसाठी ३२ सीसीटीव्हींचा वॉच राहणार आहे.

देवस्थान भाविकांच्या सोयी सुविधेसाठी १००, ग्रामपंचायत २५ पुरुष तर स्वच्छतेसाठी १५ महिला स्वयंसेवक तैनात करणार असून सुमारे ६०० दुकाने व हॉटेल्ससाठी ग्रामपंचायतीने नियोजन केल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे यांनी दिली. सोमवारी (दि.२६) सकाळी नऊ वाजता सद्गुरु रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात येणार आहे.

घटी बसणाऱ्यांची नियमित आराेग्य तपासणी
भक्तनिवास व मंदिर ट्रस्टने सुमारे ३ हजार घटी बसणाऱ्या भाविकांची सोय केली आहे. या भाविकांना शुद्ध पाणी व मोफत गोळ्या औषधे पुरविण्यात येणार आहे. कुणाल दराडे फाउंंडेशनने यात्रा काळात नऊ दिवस घटी बसणाऱ्या भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करणार असून औषधे ही देणार आहेत. ग्रामपंचायत व शहरातील सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य शिबिर, आरोग्य विभागाकडून दोन दिवस रक्तदान शिबिर आयोजित केले जाणार आहे.

बंदोबस्त असा
येवला शहर पोलिसांनी शिस्तबद्ध नियोजन केले असून या बंदोबस्तासाठी मंदिर परिसरात एक राहुटी नऊ दिवस असेल. राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी, ४ पोलिस अधिकारी, शहर पोलिस ठाण्याचे ३० पोलिस कर्मचारी तर बाहेरील ३० व ५० होमगार्ड कर्मचारी असा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.