आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी मंत्री दादा भुसे यांच्या जुगार अड्ड्यावरील छाप्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. अपर पाेलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी बुधवारी सकाळी कार्यक्षेत्रातील प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. भविष्यात अवैध धंदे आढळून आल्यास संबंधित ठाण्याच्या ठाणेदारास जबाबदार धरुन कारवाई करण्याच्या सक्त सूचना दिल्या. उपअधीक्षकांनी अवैध धंद्यांच्या कारवायांचा नियमित आढावा घेण्याचे निर्देशही खांडवी यांनी दिले.
माजी मंत्री दादा भुसे यांनी तालुक्यातील वडनेर भागात जुगार अड्ड्यावर साेमवारी छापा टाकला हाेता. हा अड्डा वडनेर खाकुर्डी पाेलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर राजराेसपणे सुरू हाेता. दादा भुसे यांच्या छाप्यानंतर पाेलिस उपअधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी त्यांच्या दालनात विभागातील मासिक क्राइम बैठक घेत वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. जुगार, मटका, सट्टा अशा धंद्यांना पायबंद घाला. गावठी दारू तयार करून विक्री हाेत असल्याच्या तक्रारी आहेत. हे अड्डेही उद्ध्वस्त करा. ग्रामीण भागातून शेतीपयोगी जनावरांची चाेरी हाेत आहे. यात शेतकऱ्यांचे नुकसान हाेत असून रात्रीची गस्त वाढवून चाेरट्यांवर लक्ष्य केंद्रित करा. आपल्या ठाण्याच्या क्षेत्रात काेणते गैरप्रकार सुरू आहेत याची ठाणेदारांनी माहिती ठेवावी. गुन्हेगारी वाढीला चालना देणाऱ्या बेकायदा धंद्यांवर धडक कारवाया करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही खांडवी यांनी दिल्या. बैठकीस नाशिक ग्रामीणचे पाेलिस उपअधीक्षक पुष्कराज सूर्यवंशी, मालेगाव तालुका पाेलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक हेमंत पाटील, शहरचे निरीक्षक सुरेश घुसर, खाकुर्डीचे सहायक निरीक्षक डी. एस. शिंदे, मालेगाव कॅम्पचे सहायक निरीक्षक प्रकाश काळे उपस्थित हाेते.
पाेलिस निरीक्षक शिंदेंच्या उचलबांगडीची शक्यता
भुसे यांनी एप्रिल महिन्यात तालुका पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील जुगार अड्ड्यावर छापा टाकला हाेता. या कारवाईनंतर तालुक्याचे तत्कालीन निरीक्षक देवीदास ढुमणे यांची उचलबांगडी झाली हाेती. त्यामुळे वडनेर खाकुर्डी ठाण्याच्या क्षेत्रातील कारवाईसाठी सहायक निरीक्षक शिंदे यांना जबाबदार धरून त्यांचीही उचलबांगडी हाेण्याची शक्यता व्यक्त हाेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.