आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे गटाचे उमेदवार दिनकर उगले यांच्याविरोधात त्यांचे सख्खे बंधू भारत कोकाटे यांच्या उमेदवारीला माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवानेते उदय सांगळे, माजी अध्यक्ष बंडूनाना भाबड यांनी सर्वार्थाने बळ दिले आहे. आ. कोकाटे यांनी भावकी आणि राजकारणाची गल्लत न करता उमेदवार उगलेंना विजयी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. मजूर फेडरेशनची ही निवडणूक आमदार कोकाटेंसाठी अस्तित्वाची तर वाजे-सांगळे गटासाठी प्रतिष्ठेची लढाई बनली आहे.
रविवारी (दि. २५) नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनची निवडणूक होत आहे. सिन्नर तालुका संचालकपदासाठी आमदार कोकाटे गटाकडून दिनकर उगले तर वाजे -सांगळे गटाकडून भारत कोकाटे यांच्यात ही काट्याची लढत होत आहे. तालुक्यात ६६ मजूर सहकारी सोसायट्या कार्यरत आहेत. त्यापैकी ३ सोसायट्या थकीत असल्याने ६३ प्रतिनिधींना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. ६ अल्पसंख्याक, २२ वंजारी आणि उर्वरित ३५ मराठा अशी मतदारांची सामाजिक स्थिती आहे.
मात्र, दोन्हीही उमेदवार मराठा समाजाचे असल्याने अल्पसंख्याक आणि वंजारी समाजाच्या मतांवरच त्यांच्या विजयाची भिस्त आहे. गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीत विजयी होण्याचा दिनकर उगले यांना अनुभव आहे. त्यांच्याकडे हक्काची ८ मते असल्याचेही सांगितले जाते तर दुसरीकडे भारत कोकाटे यांच्यासारखा तोडीस तोड आणि फ्रेश चेहरा वाजे- सांगळे गटाला लाभला आहे. विरोधी उमेदवारावरील नाराजी भारत कोकाटे यांच्या विजयासाठी पुरेशी असल्याचे भांडवल वाज-सांगळे गटाकडून केले जात आहे. दोन्ही उमेदवारांनी विजयाचे गणित मांडल्याने कुणाच्या पारड्यात किती मते पडतात आणि विजयी रथावर कोण स्वार होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यांना मिळाली संधी... : दिनकर उगले सलग १७ वर्षांपासून मजूर फेडरेशनवर संचालक आहेत. अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. याशिवाय तालुक्यातून बंडूनाना भाबड, शशिकांत आव्हाड, स्व. पांडुरंग आव्हाड, शेखर चोथवे, रामनाथ खुळे, नंदा भाबड यांनाही संचालक म्हणून संधी मिळाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.