आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या नऊ वर्षांपासून निफाड सहकारी साखर कारखाना बंद असून तीन वर्षांपासून निसाका भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. शेतकऱ्यांचा अंत न पाहता नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने निसाका भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया त्वरित पूर्ण करून कारखाना चालू करावा, अशी मागणी ऊस उत्पादकांनी केली आहे. निफाड साखर कामगार संघटनेच्या पुढाकाराने पिंपळस ग्रामपालिकेच्या सभागृहात आयोजित शेतकरी व कामगार यांच्या संयुक्त बैठकीत ही मागणी करण्यात आली. यावेळी अनेक ऊस उत्पादकांनी कारखाना भाडेतत्त्वाच्या प्रक्रियेतील दिरंगाईबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
सभेच्या अध्यक्षस्थानी निफाडचे ऊस उत्पादक शिवाजीराव ढेपले होते. यावेळी ऊस उत्पादक माणिकराव सरोदे, माधवराव गिते, बाजीराव भंडारे, नारायण शिंदे, सदाशिव खेलूकर, सचिन मोगल, गबाजी तात्या मत्सागर, पिंपळसचे सरपंच तानाजी पूरकर, उपसरपंच विलासराव मत्सागर, जगन आप्पा कुटे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुधाकर मोगल, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र मोगल, विष्णुपंत मत्सागर, बंडू बैरागी, सदस्य राजेंद्र मोगल, बंडू बैरागी, कामगार संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी व कामगार उपस्थित होते.
येत्या आठ ते दहा दिवसांत आजी-माजी लोकप्रतिनिधी, कारखान्याचे माजी संचालक, सहकारी क्षेत्रातील कार्यकर्ते व कामगार प्रतिनिधींची संयुक्त बैठक कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्याचे सूतोवाच उपस्थित ऊस उत्पादकांच्या सूचनेनुसार करण्यात आले. भाडेतत्त्वाच्या प्रक्रियेतील अडचणी व सत्य जाणून घेण्यासाठी साईकृपा शुगर इंडस्ट्रीजच्या प्रशासनाबरोबर प्रमुख प्रतिनिधींनी चर्चा करावी, असा निर्णय घेण्यात आला. कामगार संघटनेचे सरचिटणीस बी. जी. पाटील यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी प्रमुख ऊस उत्पादकांनी आपले विचार व्यक्त करून सूचना मांडल्या. कारखाना चालू करण्यासाठी सभासद कामगारांनी संयुक्तरित्या प्रयत्न करावे, वेळ पडल्यास केंद्रीय सहकार खात्याची मदत घ्यावी, तालुक्यातील सर्व राजकीय नेतृत्वाची एकत्रित बैठक घेऊन त्यांना जबाबदारीची जाणीव करून द्यावी, कारखान्याच्या नकारात्मक गोष्टींऐवजी उत्पादनक्षमता व अन्य सकारात्मक बाबी मांडाव्यात आदी उपयुक्त सूचना ऊस उत्पादकांनी केल्या.
बैठकीच्या यशस्वितेसाठी कामगार संघटनेचे पदाधिकारी नवनाथ गायकवाड, बाळासाहेब वागस्कर, सुभाष झोमन, उत्तम गायकवाड, संपत कडलग, उत्तम देशमाने, राजेंद्र सुरवाडे, पंढरीनाथ उगले व ग्रामपालिका कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.