आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत:महागठबंधन आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर

मुजम्मील इनामदार| मालेगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या राजकीय पटलावर बदलत्या समीकरणांची नांदी ठरलेली महागठबंधन आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर पाेहाेचली आहे. याला निमित्त आमदार मुफ्ती माेहम्मद इस्माईल यांची मुख्यमंत्री शिंदेंच्या सभामंचावरील उपस्थिती ठरली आहे. हिंदुत्व व धर्मनिरपेक्ष विचारांच्या मतभिन्नतेमुळे घटकपक्ष जनता दलने आघाडीचे प्रमुख आमदार मुफ्तींची भूमिकाच संशयास्पद ठरविली आहे. या संशयकल्लाेळात आघाडीची जुळलेली नाळ ताणली गेल्याने आगामी महापालिका व विधानसभा निवडणुकांची राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत दिले जात आहेत.

माजी आमदार रशिद शेख व आसिफ शेख यांच्या एकछत्री सत्तेला सुरुंग लावण्यासाठी ४ एप्रिल २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीपूर्वी महागठबंधन आघाडीची निर्मिती झाली हाेती. तेव्हा मुफ्ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना महागठबंधनने त्यांच्या नेतृत्वात जनता दलच्या बरोबर महापालिका निवडणूक लढवून २७ जागा मिळविल्या हाेत्या. पालिका निवडणूक एकत्र लढून विधानसभेत जनता दलने उमेदवार देऊ नये असे महागठबंधन आघाडीचे ठरले हाेते. २०१९ ला विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर मुफ्तींनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत एमआयएममध्ये प्रवेश केला हाेता. या निवडणुकीत जनता दलने प्रामाणिकपणे काम करत मुफ्तींच्या विजयात माेलाची भूमिका बजावली हाेती. पालिका सभागृहात जनता दलचे तत्कालीन प्रमुख स्व. बुलंद इकबाल, मुस्तकिम डिग्निटी, शान-ए-हिंद यांनी सत्ताधाऱ्यांविराेधात रान उठविले हाेते.

विराेधकांना फायदा
गटबंधनमध्ये फूट पडल्यास याचा फायदा साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडणार आहे. दंगलीच्या गुन्ह्यात मदत केली नाही म्हणून नाराज कंपाउंडचा एक गट आमदार मुफ्तींपासून दुरावला आहे. आता जनता दलही स्वबळ आजमावण्याच्या तयारीत दिसत आहे. एमआयएमचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डाॅ. खालिद परवेज यांनी गठबंधनच्या अनुषंगाने आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे विराेधकांची एकजूट व स्वकियांचा निर्माण हाेत असलेला दुरावा आमदार मुफ्तींची राजकीय वाटचाल बिकट करणारा ठरू शकतो.

बातम्या आणखी आहेत...