आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामस्थांनी एखादी गोष्ट ठरवली आणि मनापासून केली तर अशक्य ते शक्य होते याची प्रचिती नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी येथे आली. गावातील १४ वर्षांचा सम्या हा मतिमंद मुलगा अचानक हरवला. संपूर्ण गावाला त्याची चिंता वाटू लागली. मग ग्रामस्थांनीही आपापल्यापरीने सोशल मीडियाचा आधार घेत शोधमोहीम सुरू केली आणि या प्रयत्नांना यश आले. बेपत्ता झालेला सम्या नाशिक येथे मिळून आला आणि ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडत एकच जल्लोष केला. वंजारवाडी येथील अरुण शरद खैरनार ऊ र्फ सम्या ( १४) हा अचानक बेपत्ता झाला.
ग्रामस्थांनी त्याचा बराच शोध घेतला पण तो मिळून आला नाही. अखेर मनमाड शहर पोलिस ठाण्यात याबाबत रितसर नोंद करण्यात आली. ग्रामस्थांनीही आपापल्यापरीने त्याचा शोध सुरू केला. प्रत्येकाने त्याचा फोटो स्टेट्स आपल्या मोबाइलवर ठेवला. सम्या ऊर्फ अरुण हा मतिमंद आहे. तो स्वतःचे नावदेखील सांगू शकत नसल्याने ग्रामस्थांची चिंता वाढू लागली. तो अत्यंत गरीब परिवारातील आहे. आई-वडील हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवतात. त्यामुळे संपूर्ण गावाला सम्याची चिंता वाटू लागली. आठ दिवस उलटून गेले तरीदेखील त्याचा शोध लागू शकला नाही, पण ग्रामस्थांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. वंजारवाडीतील एक कर्मचारी संदीप अहिरे हे कामासाठी नाशिकला गेले होते.
ते नाशिकराेड रेल्वेस्टेशनवर मनमाड येथे येण्यासाठी आले. तेव्हा रेल्वेस्थानकात त्यांची नजर समोर उभ्या असलेल्या सम्यावर पडली, त्यांनी तत्काळ त्याला जवळ घेतले आणि वंजारवाडी गावात फोन करून सम्या सापडल्याची माहिती दिली. हे वृत्त गावात पसरताच संपूर्ण गावात आनंद पसरला. सम्याचे गावात आगमन होताच गावकऱ्यांनी डीजे लावून एकच जल्लोष केला. गावात मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.