आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांचे भाषा, संवादकाैशल्य वाढीस लागावे, त्यांच्या प्रतिभा शक्तीचा विकास व्हावा या उदात्त हेतूने सिन्नर शहरातील मविप्रच्या अभिनव बालविकास मंदिरातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत स्वखर्चाने ३०० ग्रंथांचे दालन विद्यार्थ्यांसाठी खुले केले आहे. सुमारे १५ हजार रुपये खर्च करून विविध प्रकारची वाचनीय पुस्तके शिक्षकांनी या ग्रंथालयात उपलब्ध करून दिली आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, वाचनाची गोडी निर्माण व्हावी आधुनिक युगातील इलेक्ट्रॉनिक टीव्ही, मोबाइल अशा उपकरणांपासून विद्यार्थी दूर रहावे, या उदात्त हेतूने हा ‘अभिनव'' उपक्रम राबवण्यात आला आहे. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत विद्यार्थी आणि शिक्षक वाचनालयासाठी पुस्तके भेट दिली.
या पुस्तकांच्या वाचनातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्याबराेबरच ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून दूर होतील, अशी आशा शिक्षकांना आहे. या उपक्रमासाठी मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, संचालक कृष्णाजी भगत यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक अविनाश साळुंखे, प्रभारी मुख्याध्यापक संतोष जगताप, नितेश दातीर, प्रतिभा पगार, संगीता गाडे, शोभा गायखे, सरला वर्पे, सुरेखा भोर, शीतल देवरे, संगीता जाधव, ज्योती शिंदे, मनिषा तांबे, कविता पवार, वैभव केदार, योगेश हिंगे, अर्चना खालकर, कविता कदम, प्रतिभा पवार, ढोमाडे आदी कर्मचाऱ्यांनी मदतकार्य उभे केले.
वाढदिवसानिमित्त मुले देतात वाचनीय पुस्तके भेट
आपल्या वाढदिवशी अभिनव बालविकास मंदिरातील चिमुकले चॉकलेट व विविध खाऊंचे पदार्थ शाळेत न आणता शाळेसाठी एक वाचनीय पुस्तक उपलब्ध करून देतात. पालकांचे या उपक्रमात योगदान लाभत असते. शिक्षकांनी त्यास आणखी हातभार लावला आहे. यामध्ये थोर साहित्यिक, बालमित्र, सवंगडी, विविध प्रकारच्या गोष्टी, थोर महापुरुषांचे जीवनचरित्र , आत्मकथा, कादंबऱ्या अशा ग्रंथसंपदेचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.