आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनोदाची मैफल:विनोदाचे टॉनिक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी बनवते सुदृढ; व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांचा सल्ला

येवला17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थी मित्रांनो, आई-वडील व गुरुजनांची सेवा करा, त्यांना आदर्श माना. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चांगला अभ्यास करा. विद्यार्थ्यांना विनोदाचे टॉनिक अभ्यासासाठी अधिक सुदृढ व मानसिकदृष्ट्या परिपक्व बनविते, असा सल्ला प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी दिला. याचवेळी त्यांनी विनोदाची मैफल रंगवली तसेच वेगळेवेगळे जादूचे प्रयोग करून विद्यार्थ्यांची उत्सुकताही वाढविली आणि कुतूहलही जागविले.

सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल व एम. जी. पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात प्रसिद्ध व्यंगचित्रकार व समाजसेवक प्रभाकर झळके यांच्या जादूच्या प्रयोगाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाचे प्राचार्य शरद ढोमसे अध्यक्षस्थानी होते. शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस प्रमोद पाटील व सहसरचिटणीस प्रवीण पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी झळके यांनी प्रारंभी विनोदाची मैफल रंगवत विद्यार्थ्यांना खळखळून हसवले. त्यानंतर विविधांगी जादूचे प्रयोग करत विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढवत करमणूकही केली. अनेक प्रयोगांतून त्यांनी विद्यार्थ्यांचे कुतूहल जागवत त्यांच्यामध्ये विज्ञाननिष्ठादेखील निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

प्रारंभी प्राचार्य शरद ढोमसे यांच्या हस्ते झळके यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. या निमित्ताने इंडियन आयडॉल, गानकोकिळा आम्रपाली पगारे हिने बाप्पाच्या गीतांचे गायन केले तर नांदूर येथील चिमुकली साक्षी पगारे हिने नृत्य सादर करून वाहवा मिळविली. या दोघींच्या कलेवर खुश होऊन झळके तसेच ढोमसे व पालकांनीही या दोघींवर बक्षिसांचा वर्षाव केला.

यावेळी ज्येष्ठ शिक्षक गजानन नागरे, भाग्यश्री सोनवणे यांनी प्रास्ताविक करत उपक्रमाची माहिती दिली. रोहिणी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ शिक्षक पोपट भाटे, योगेश भालेराव, उमाकांत आहेर, संतोष विंचू, योगेश पवार, ऋषिकेश काटे, रवींद्र दाभाडे, लक्ष्मण माळी, मयुरेश पैठणकर, सगुणा काळे, सविता पवार, उज्ज्वला तळेकर, अर्चना शिंदे, मच्छिंद्र बोडके आदींनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.

बातम्या आणखी आहेत...