आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मालेगावात गोवरने एकही बालमृत्यू नाही

मालेगाव5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गोवरबाधित ५६ रुग्ण आढळून आले आहेत. यातील ११ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. मात्र, उपचाराने हे रुग्ण लवकरच बरे होतील. आतापर्यंत गोवरने एकही बाल मृत्यू झालेला नाही. मनपा आरोग्य विभागाने बालकांचे लसीकरण सुरू केले आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी धर्मगुरु व धार्मिक संघटनांनी नागरिकांमध्ये जनजागृती करून आजारापासून बालकांचे संरक्षण करावे, असे आवाहन महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी केले.

गोवर रुग्ण संख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. २२) दुपारी मनपा सभागृहात मुस्लीम धर्मगुरु व धार्मिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला गोसावी यांनी मार्गदर्शन केले. मुंबई शहरात गोवर रुग्णांची संख्या जास्त आहे. तेथे काही रुग्ण दगावले आहेत. मात्र, मालेगाव शहरात रुग्ण संख्या नियंत्रणात आहे.

बाधित बालकांवर योग्य उपचार होत आहे. सद्या लसीकरणावर अधिक भर देण्याची गरज आहे. काही नागरिक लसीकरणास विरोध करतात. आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने २०११ मध्ये शहर पोलिओ मुक्त झाले. त्याच प्रमाणे आत्ताही लसीकरणासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन जनजागृती करावी. गोवरच्या संकटावर आपण मात करू, असा विश्वास गोसावी यांनी व्यक्त केला.

आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी घरोघरी जाऊन बालकांचा सर्व्हे सुरू असल्याचे सांगितले. ७२६ बालकांची तपासणी केली आहे. ज्या ९ ते १८ महिन्याच्या बालकांना गोवर लस दिली नसेल त्यांना पालकांनी जवळील नागरी आरोग्य केंद्र, अंगणवाडी व नियमित लसीकरण होणाऱ्या मदरसामध्ये नेऊन लस द्यावी.

आरोग्य विभागाने केलेल्या लसीकरण व उपचार नियोजनाची माहिती डॉ. ठाकरे यांनी दिली. बैठकीस जमियत उलमाचे अध्यक्ष तथा आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, डब्ल्यूएचओचे डॉ. प्रकाश,मौलाना अब्दुल कय्युम कासमी, मौलाना इम्तियाज इक्बाल, कारी इकलाख जमाली, फकीर मोहम्मद, डॉ. इकलाख, कारी अहमद जलिली आदी उपस्थित होते.

जनतेला प्रोत्साहित करू
कुठलीही साथरोग आल्यास मनपाने धर्मगुरु व धार्मिक संघटनांची वेळोवेळी मदत घेतली आहे. गोवर आजारावर उपचार असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. विविध धार्मिक संघटना जनजागृती करतील, असे आमदार मुफ्ती यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...