आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिन्यांचे वेतन:उपजिल्हा रुग्णालयातील 48 कंत्राटी कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन थकले

येवलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी कामगारांनी थकीत वेतनासाठी शुक्रवारी (दि. २) संपूर्ण दिवसभर काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन केले. यामुळे जिल्हा रुग्णालयातील सेवांवर परिणाम झाला. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दखल घेऊन येत्या आठ दिवसांत सर्व कर्मचाऱ्यांचे पगार करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले आहेत.

येथील उपजिल्हा रुग्णालयात नाशिक येथील एम. व्ही. जी. अर्थात महाराष्ट्र विकास ग्रुप या खाजगी कंपनीतर्फे एकूण ४८ सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये महिला व पुरुष आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या सर्वांचे जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांचे वेतन या कामगारांना मिळाले नसून त्यांच्या नियुक्तीचा कालावधीदेखील संपलेला आहे. केवळ तोंडी आश्वासनावर पुढील काम करून घेतले जात आहे. यामुळे कंत्राटाची नियुक्ती कायम करून मिळावी. तसेच जून ते ऑगस्ट असे तीन महिन्याचे थकीत वेतन मिळावे, या मागणीसाठी या सर्व ४८ कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते. यामुळे उपजिल्हा रुग्णालयाच्या सेवांवर परिणाम होऊन रुग्णांची काहीकाळ गैरसोय झाली.

कंत्राटी कामगारांच्या या आंदोलनाची माहिती मिळताच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी याप्रश्नी तातडीने लक्ष घालत येत्या आठ दिवसांत सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याचे आदेश संबधीत ठेकेदाराला दिले. याप्रश्नी ठोस आश्वासन मिळाल्याने कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाल्याने रुग्णालयातील कामकाज सुरळीत झाले आहे.

गेल्या तीन महिन्यांचे वेतन या कामगारांना मिळाले नसल्याने त्यांची उपासमार सुरू होती. सदर कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी नियुक्तीचा कालावधीदेखील संपलेला असून केवळ तोंडी आश्वासनावर कर्मचारी काम करत आहेत. त्यामुळेच त्रस्त कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.आंदोलनाची माहिती मिळताच भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक लोणारी यांनी रुग्णालयात जाऊन कर्मचाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न निकाली काढला. पुढील आठ दिवसात या कर्मचाऱ्यांच्या पगारासह इतर मागण्या पूर्ण करण्यात याव्यात, असे आदेश संबंधितांना दिले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटला असून कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. रुग्णसेवेत व्यत्यय आला नसून कामकाज सुरळीत सुरू असल्याची माहिती लोखंडे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...