आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हस्तांतरित:निसाका कडलग कंपनीकडे हस्तांतरित, दुरुस्तीचे काम हाेणार सुरू

निफाड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षांनुवर्ष बंद स्थितीत असलेला निफाड सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास देण्याच्या निविदा प्रक्रियेत दोन महिन्यांपूर्वी नाशिक येथील बी.टी. कडलग कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अव्वल आली होती. दरम्यानच्या काळात कायदेशीर सर्व बाबींची पूर्तता करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व कडलग कंपनी यांच्यात भाडे करारनामा झाला. जिल्हा बॅकेने कारखाना कंपनीकडे हस्तांतरण केला असून लगेच कारखान्याच्या मेंटेनन्सला सुरुवात होणार असल्याची माहिती कडलग कंपनी प्रशासनाने दिली आहे.

निफाड सहकारी साखर कारखान्याने जिल्हा बँकेकडून १५ वर्षांपूर्वी कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न झाल्याने दहा वर्षांपूर्वी जिल्हा बँकेने कारखान्याचा ताबा घेतला होता. तेव्हापासून कारखाना बंद अवस्थेमध्ये होता. ताे सुरू व्हावा, यासाठी काही वर्षांपासून विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू होते. कारखाना सुरू व्हावा, यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून यापूर्वी अनेकदा आंदोलनेही झालेली आहेत. परंतु बँकेचे कर्ज असल्याने कारखाना सुरू होण्यास अनेक अडथळे होते. राजकीय पक्षांचे पदाधिकारी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तगाद्यामुळे जिल्हा बँकेने कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यात देण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेतला होता.

बँक प्रशासनाने तिन महिन्यांपूर्वी या विषयी टेंडर प्रक्रिया सुरू केली होती. पाच मक्तेदारांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता. या प्रक्रियेत नाशिक शहरातील बी.टी. कडलग कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनी निविदा प्रक्रियेत अव्वल आल्याने निविदा मंजूर करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात जिल्हा बँक आणि कंपनीने कायदेशीर सर्व बाबींची पूर्तता करत सोपस्कर पार पाडले. यांच्यात पिंपळगाव येथील रजिस्टर कार्यालयात पंचवीस वर्षांसाठी भाडेकरारनामा झाला. ताे पूर्ण होताच जिल्हा बँकेने निफाड कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा कंपनीकडे हस्तांतरित केला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, बी.टी.कडलग, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे, धनवटे आदी उपस्थितीत होते.

मे महिन्याच्या आत पहिले गाळप
दोन दिवसात कारखान्यामधील यंत्रसामग्रीच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू होणार असून मे महिन्याच्या आत पहिले गाळप घेण्याचा मानस कडलग कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडने व्यक्त केला आहे. कारखाना आता सुरू होणार असल्याने निफाड तालुक्यातील ऊस उत्पादकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...