आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा सरस्वती नदीत सोडलेले सांडपाणी तत्पूर्वीच अडवून नगरपरिषदेने शुद्धीकरण प्रक्रियेद्वारे बगीचा तर फुलवलाच, मात्र नदीचे प्रदूषणही काही प्रमाणात कमी करण्यात यश मिळविले आहे. महिला बचतगटाच्या सहाय्याने दररोज ४० हजार लिटर पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केली जात आहे. असा प्रकल्प राबवणारी सिन्नर नगरपरिषद जिल्ह्यात पहिलीच ठरली आहे.
सीइपीटी विद्यापीठाच्या सहाय्याने पुढचे पाऊल म्हणून नदी प्रदूषित होण्यापासून वाचावी याकरिता पथदर्शी प्रकल्प म्हणून नगरपरिषदेने रामनगरी या उपनगरातून वाहून येणारे सांडपाणी ऐश्वर्या गार्डनजवळ ६० हजार लिटर क्षमतेच्या टाकीत अडविले. सद्यस्थितीत रोज ४० हजार लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. मुख्याधिकारी संजय केदार, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता हेमलता दसरे, स्वच्छता निरीक्षक रवींद्र देशमुख, अश्फाक शेख, इच्छापूर्ती महिला बचतगटाच्या सदगीर यांनी त्यासाठी परिश्रम घेतले.
अशी चालते प्रक्रिया
प्रकल्पात दररोज ४० हजार लिटर सांडपाणी जमा होते. वीज पंपाद्वारे पाणी प्रकल्पात आल्याबरोबर प्रथम ऑइल, ग्रीस, तेलकटपणा काढला जातो. दुसऱ्या साठवण टाकीत पाण्यातील गाळ, खडे, घाण बाजूला केली जाते. हवेच्या दाबाने पाण्याचा वास घालवला जातो. तिसऱ्या टाकीत तयार झालेल्या बॅक्टेरियांमुळे पाणी अधिक शुद्ध होते. हे पाणी वाळूच्या फिल्टरमध्ये सोडून अधिक स्वच्छ केले जाते. अखेरीस क्लोरीन वायू पाण्यात सोडून शुद्ध पाणी उपलब्ध होते. हा प्रकल्प संपूर्णपणे सोलर ऊर्जेवर सुरू आहे.
प्रदूषित पाणी नदीत जाण्यापासून रोखले
रामनगरी परिसरातील गटारीचे पाणी सरस्वती नदीला सोडलेले होते. या पाण्यावर शुद्धीकरण प्रकल्प बसवल्याने नदीत जाण्यापासून हे प्रदूषित पाणी वाचले आहे. परिणामी सरस्वती नदीचे प्रदूषण काही प्रमाणात रोखण्यास मदत झाली आहे. विशेष म्हणजे शुद्ध झालेल्या पाण्यातून इच्छापूर्ती महिला बचतगटाने दोन महिन्यांपासून ऐश्वर्य गार्डनची देखभाल हाती घेतली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.