आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील जोपूळ रोडलगत उभारण्यात आलेल्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर बंद झाल्याने दोन वर्षांनंतर लवकरच सामान्य रुग्णांसाठी खुले करण्यात येणार आहे. रुग्णालयात ६० बेडची व्यवस्था राहणार असून वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ३० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून एप्रिल अखेर हे रुग्णालय कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार दिलीप बनकर यांनी सांगितले.
पिंपळगाव शहराची लोकसंख्या सुमारे ६५ हजार असून परिसरात २४ गावे आहेत. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी राज्य शासनाने पिंपळगावी उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले आहे. त्यानुसार २४ ऑक्टोबर २०१८ रोजी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या रुग्णालयाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर जानेवारी २०२० मध्ये इमारत बांधकाम पूर्ण झाले. मात्र, रंगरंगोटी व इतर काही कामे बाकी असल्याने ते काम सुरू होते. याच दरम्यान कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने बाधित रुग्णांवर उपचारासाठी एप्रिल २०२१ मध्ये रुग्णालयाच्या इमारतीत कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते.
मात्र, आता येथे एकही कोरोना रुग्ण नसल्याने या रुग्णालयातील कोविड सेंटर बंद करून ते सामान्य रुग्णांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता या रुग्णालयासाठी कर्मचारी भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. साधारणत: १५ ते २० एप्रिलपर्यंत कर्मचारी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन असून एप्रिल अखेरपर्यंत रुग्णालय सामान्य रुग्णांवर उपचारासाठी खुले करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.