आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:सिव्हिलच्या कुटुंब नियोजन कक्षात एकाच काॅटवर दाेन रुग्णांवर उपचार

संदीप जाधव | नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा शासकीय रुग्णालयातील वार्डमध्ये रुग्णांची दयनीय अवस्था झाली होत असून मेडिकल काॅलेज प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना केल्या जात नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. रुग्णालयात रात्री प्रत्यक्ष पाहणी केली असता. कुटुंब नियोजन कक्षात एकाच बेडवर दोन महिला रुग्ण ठेवल्याचे निदर्शनास आले. कक्षात सहा बेड असून रुग्णसंख्या १५ होती. दोन महिला रुग्ण चक्क जमिनीवर झोपल्याचे धक्कादायक वास्तव दिसून आले.

शासकीय रुग्णालय शासकीय मेडिकल काॅलेजकडे हस्तांतरित केले आहे. नवीन पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेकरिता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकाप्रमाणे आवश्यक असलेल्या आरोग्य विभागांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय हे वैद्यकीय शिक्षण अौषधी द्राव्ये विभागास तात्पुरत्या स्वरूपात नि:शुल्क वापरास दिले आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक वगळता सर्व स्टाफ काॅलेज प्रशासनाकडे वर्ग केला आहे. मेडिकल प्रशासनाचे वैद्यकीय अधिकारी येथे उपलब्ध आहेत. काॅलेज सुरू झाल्याने रुग्णांना दर्जेदार सेवा मिळणे अपेक्षित असताना त्यांचे हाल होत आहे. कुटुंब नियाेजन, गर्भपिशवीसंबंधी आजाराच्या शस्त्रक्रिया केल्यानंतर या रुग्णांना कुटुंब नियोजन कक्षात दाखल केले जाते. शस्त्रक्रियेनंतर महिलांना प्रचंड त्रास हाेत असताना कक्षात बेड उपलब्ध नसल्याने त्यांना थंडीत फरशीवर झोपावे लागत आहे.

इतर वार्डमध्येही अशीच परिस्थिती
महिला कक्षात एका काॅटवर दोन दोन रुग्ण असल्याचे निदर्शनास आले. अशीच परिस्थिती पुुरुष शल्य कक्षात असल्याच्या तक्रारी आहेत. पीएनसी वार्डमध्येही बेड कमी आणि रुग्णसंख्या जास्त असल्याने रुग्णांना जमिनीवर झोपावे लागत आहे.

सिव्हिल प्रशासनाकडे तक्रार, मात्र दखल नाही
महिला कक्षासंदर्भात अतिरिक्त शल्यचिकित्सकांकडे तक्रारी केल्या आहेत. मेडिकल काॅलेज प्रशासनाकडे रुग्णालय वर्ग झाल्याने सिव्हिलच्या प्रशासनाचा काही संबध नसल्याचे सांगून हात झटकले जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

परिचारिकांना धरले जाते जबाबदार
रुग्ण कक्षात रुग्णांना सुविधा मिळत नसल्याने कक्षात कार्यरत असलेल्या परिचारिकांना रुग्णांच्या नातेवाइकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. कक्षात सुविधा नसल्याचे कारण देत मेडिकल प्रशासनाकडून परिचारिकांना जबाबदार धरले जात असल्याने नाराजी आहे.

४ दिवसांपासून जमिनीवर
गर्भपिशवी संबंधित शस्त्रक्रिया झाली आहे. चार दिवसांपासून कक्षात आहे. काॅट नसल्याने रोज खाली झोपावे लागते. शस्त्रक्रियेने कंबर दुखते. - हिना कौसर, मालेगाव

लवकरच गैरसोय टळेल
रुग्णालयाच्या आवारात २०० बेडचे महिला व बालरुग्णालयाची इमारत होत आहे. लवकरच ही इमारत हस्तांतरित होणार आहे. महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू होणार असल्याने लवकरच ही गैरसोय टळले. - डाॅ. राजकुमार सूर्यवंशी, मेडिकल काॅलज प्रशासन

त्रास सहन होत नाही
शस्त्रक्रिया झाल्याने त्रास होत आहे. एका बेडवर दोन रुग्ण ठेवले जात असल्याने काॅटवरून खाली पडण्याची भीती वाटते. जमिनीवर झाेपल्याने प्रचंड त्रास होताे. - हिराबाई राऊत, हरसूल

बातम्या आणखी आहेत...