आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा ठप्प:मालेगाव मनपा जलवाहिनीचा व्हॉल्व्ह नादुरुस्त, पाणीपुरवठा ठप्प

मालेगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका गिरणा धरण वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला उंबरदे जवळ असलेल्या ३५० मिमी व्यासाचा वॉश आउट व्हॉल्व्ह गुरुवारी नादुरुस्त झाल्याने दुपारी १.३० वाजेपासून शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाने युद्ध पातळीवर व्हॉल्व्ह बदलला आहे. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गिरणा धरण उद्भववरून पाणी पंपिंग सुरू झाले. या अडथळ्यांमुळे तब्बल २४ तास शहरात विलंबाने पाणीपुरवठा होणार आहे.

गिरणा धरण ते उंबरदे दरम्यान रस्त्यालगत असलेल्या महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीला असलेला वॉश आउट व्हॉल्व्ह गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास अचानक नादुरुस्त झाला. त्यामुळे जलवाहिनीत असलेले लाखो लिटर पाणी प्रचंड वेगाने वाहू लागले.

पाण्याचा वेग इतका जबरदस्त होता की लगतचा रस्ता अक्षरशः फुटला. रस्त्यावर खड्डे पडले असून रस्ता रहदारीयोग्य राहिलेला नाही. जलवाहिनीचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याचे कळताच पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने तंत्रज्ञांना बरोबर घेऊन घटनास्थळ गाठले. यावेळी गिरणा धरण उद्भववरून पाणी पंपिंग बंद होते. तरीदेखील जलवाहिनी रिक्त होण्यासाठी चार तासांचा कालावधी लागला. त्याचवेळी तत्काळ शहरातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला.

शहरात दुपारी साडेबारा वाजेपासून पाणीपुरवठा ठप्प झाला असून दुपारी साडेचार वाजता नादुरुस्त व्हॉल्व्ह काढून टाकण्यात येऊन या ठिकाणी नवीन व्हॉल्व्ह बसविण्यात आला आहे. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गिरणा धरणावरील पाणी पंपिंग सुरू करण्यात आले असले तरी देखील सायने बुद्रुक शिवारातील लशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचण्यास तीन तासांचा कालावधी लागणार होता. तसेच जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या टाक्या भरण्यास सुमारे दोन तासांचा कालावधी अपेक्षित आहे. कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही तर शुक्रवारी दुपारी बारा वाजेपर्यंत शहरातील पाणीपुरवठा सुरू होणार असल्याचे पालिका पाणीपुरवठा उपअभियंता जयपाल त्रिभुवन यांनी सांगितले.

दक्षता घेण्याची गरज
जलवाहिनीला वारंवार काहीतरी अडथळा येऊन जलवाहिनी फुटत असते. त्यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यांवर तसेच शिवारात जाते. परिणामी शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होते. गुरुवारी जलवाहिनी फुटल्याने रस्ता उखडला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या रहदारीला अडथळे निर्माण होणार आहेत. पालिका प्रशासनाने पूर्ण जलवाहिनीचीतपासणी करून लक्षात येणारे अडथळे तत्काळ दूर करावेत, म्हणजे शेतकऱ्यांचे नुकसान टळेल.- विजय इप्पर, ग्रा.पं. सदस्य, उंबरदे

बातम्या आणखी आहेत...