आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूरपाण्याने अडचण:गुळवंच ग्रामपंचायतीच्या दारात ग्रामस्थांनी भरवली शाळा

सिन्नर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुळवंच येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर गावतळ्याचे पाणी वाहत असल्याने विद्यार्थ्यांना पूरपाण्यातून ये-जा करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला असलेला धोका ओळखून ग्रामपंचायतीने रखडलेले मोरीचे काम पूर्ण करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी ग्रामपंचायतीच्या दारातच शाळा भरवली.

विद्यालयात तीनशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गावातून शाळेकडे जाणाऱ्या एकमेव मार्गावर गावतळ्याचे पूरपाणी वाहत आहे. कमरेएवढ्या पाण्यातून विद्यार्थ्यांना वाट काढणे अवघड होऊन बसले आहे. ग्रामपंचायतीने मोरीचे बांधकाम हाती घेतले होते. सहा महिन्यांपासून हे काम अर्धवट स्थितीत आहे. काम पूर्ण झाले असते तर रहदारीची अडचण निर्माण झाली नसती, या समस्येवरून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.‌

शिवाजी काकड, राजेश सानप, नवनाथ सानप, सदाशिव भाबड, विजय डोंगरे, गजानन कांगणे आदींनी मोरीचे अर्धवट काम पूर्ण करेपर्यंत विद्यार्थ्यांना पूरपाण्यातून शाळेत पाठवण्याऐवजी ग्रामपंचायतीत शाळा भरवणार असल्याचे पालकांना सांगितले. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोरच विद्यार्थी बसवले. यावेळी सरपंच व ग्रामसेवक बाहेरगावी असल्याने ग्रामस्थांनी त्यांच्याशीही भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सदस्य विष्णू सानप, सोमनाथ ताडगे हे आंदोलनस्थळी हजर झाले. काम लवकरात लवकर पूर्ण करू, असे आश्वासन त्यांनी दिले. संपत कांगणे यांनी ग्रामपंचायतीने काम पूर्ण केले नाही तर स्वतः खर्च करून लगेच काम पूर्ण करू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...