आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिस प्रशासन भ्रष्ट कारभारामुळे चर्चेत आले आहे. मागील दोन वर्षांत मालेगाव विभागात लाचखोर तीन वरिष्ठ अधिकारी व आठ कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. १० जून रोजी वडनेरभैरव पोलिस ठाण्याचे कर्मचारी किसन कापसे व संतोष वाघ यांना ४० हजारांची लाच घेताना पकडण्यात आले. याची जबाबदारी सहायक निरीक्षक शकील शेख यांच्यावर निश्चित करून त्यांची नाशिक नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली आहे.
मालेगाव पोलिस विभाग भ्रष्टाचारामुळे पोखरून निघाला आहे. वाढती लाचखोरवृत्ती पोलिस प्रशासनाची प्रतिमा मलीन करणारी ठरत आहे. ‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय’हे ब्रीदवाक्य पोलिसांच्या खाकी वर्दीवर लावलेले असते. याचा अर्थ सामान्य जनतेला सुरक्षित ठेवून ‘खल’ वृत्तीने वागणाऱ्यांना वठणीवर आणण्याचे काम पोलिसांनी करावे. मात्र, या ब्रीदवाक्याचा सोयीस्कर विसर पडल्याने पोलिस प्रशासनात भ्रष्टाचार बोकाळला आहे.
हा भ्रष्ट कारभार सुधारण्यासाठी कर्तव्यकठोरता व प्रामाणिकपणाचा उपदेश करत पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी वारंवार सूचना केल्या आहेत. अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनीही तंबी देत वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या सूचना व तंबी धुडकावून बेकायदा वसुलीची लाचखोरी सुरूच आहे. बळावलेल्या भ्रष्ट अपप्रवृत्तींमुळे दोन वर्षांत मालेगाव विभागातील तीन पोलिस अधिकारी व आठ कर्मचाऱ्यांची लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे.
लाचखोरी अधिकाऱ्यांच्या मुळावर
कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ठाणेदारांची आहे. त्यामुळे वडनेरभैरवच्या प्रकरणात सहायक निरीक्षक शेख यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांची तडकाफडकी नाशिक नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. यापूर्वी मालेगाव तालुका पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक नरेंद्र भदाणे, पवारवाडीचे तत्कालीन निरीक्षक गुलाबराव पाटील, मनमाडचे तत्कालीन निरीक्षक राजेंद्र कुटे, आयेशानगरचे निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनाही नियंत्रण कक्षाचा रस्ता दाखविण्यात आला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.