आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह:3636  नागरिकांची तहान भागेल इतक्या पाण्याचा दीड तासात अपव्यय; कडवा जलवाहिनीचा निखळला सांधा

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कडवा पाणी योजनेच्या जलवाहिनीचा सांधा (जाॅइंट) निखळून शिवडे येथे लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना गुरुवारी (दि. ८) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, यामुळे नागरिकांवर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. गेल्याच आठवड्यात बेलू येथे अशाचप्रकारे पाइपचा सांधा निखळून चार दिवस पाणीपुरवठा ठप्प झाला होता. सहा महिन्यांत दोन वेळा जलवाहिनी फुटण्याचे तर दोन वेळा पाइपचे सांधे निखळण्याचे प्रकार घडल्याने पाणीपुरवठा योजनेच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

शिवडा-बोरखिंड मार्गावर सकाळी ११.३० वाजता शिवडे गावाजवळ कडवाची जलवाहिनी फुटल्याने सुमारे ६० ते ७० फूट उंच कारंजे उडत होते. बराच वेळ हा मार्ग ठप्प होता. गावातील स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे माहिती दिल्यानंतर २० मिनिटांनी पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर जवळपास एक ते दीड तास पाणी रस्त्यावरून वाहत होते. या जलवाहिनीला लागून असलेल्या किसन वाघ यांच्या कोबीमध्ये तर रामदास वाघ यांच्या कोथिंबिरीच्या पिकात पाणी जाऊन मालाचे नुकसान झाले. सुमारे दीड तास सुरू असलेल्या या जलवाहिनीतून दोन लाख लिटरहून अधिक पाणी वाया गेल्याचा अंदाज आहे. जलवाहिनीतून गळती झाल्याची माहिती मिळाल्यानंतर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा अभियंता हेमलता दसरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. गुरुवारी रात्री उशिरा किंवा शुक्रवारी सकाळी जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल. त्यानंतर तीन ते चार तास त्याची चाचणी होईल आणि त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे नगरपालिका प्रशासनाने सांगितले.

जलवाहिनी गावाबाहेरून टाकावी
नगरपालिकेची जलवाहिनी फुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. शिवड्यात दगड, मातीची घरे मोठ्या प्रमाणात असून त्यातून अनर्थ होण्याची भीती आहे. त्यामुळे नगरपालिकेने गावाबाहेरून ही जलवाहिनी स्थलांतरित करुन ग्रामस्थांना दिलासा द्यावा.उत्तम हारक, ग्रामस्थ, शिवडा

दोन दिवसांत त्याची दुरुस्ती
शिवडे येथे कडबा जलवाहिनीचा सांधा निखळल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. दोन दिवसांत त्याची दुरुस्ती करून शनिवारी संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा पुरवत होईल. दोन शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन पिकांचे नुकसान झाले असून कृषी विभागामार्फत पंचनामे करून त्यांना नगरपालिकेकडून भरपाई दिली जाईल.
हेमलता दसरे, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, नगरपालिका

बातम्या आणखी आहेत...