आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालासलगावसह परिसरात बुधवारी (दि. २२) सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दमदार पावसाने नागरिकांसह शेतकरी बांधव सुखावले आहेत. निफाड तालुक्यातील अनेक गावात या दमदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली तर खेडलेझुंगे येथील आठवडे बाजारावर पावसाचा विपरीत परिणाम जाणवला. रुई, कोळगाव, डोंगरगाव, नांदगाव येथे मुसळधार पाऊस झाल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे.
दिंडोरी तालुक्यात आंबेविक्रेत्यांना फटका
शहरासह तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाने विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांची त्रेधातिरपीट उडाली. आंबे विक्रीसाठी बसलेल्या विक्रेत्यांना पावसाचा फटका बसला. तालुक्यातील जानोरी, मोहाडी, आंबेदिंडोरी, जऊळके दिंडोरी, कुर्णाली, कोऱ्हाटे, दिंडोरी, मडकीजांब आदी परिसरात जोरदार पाऊस झाला.
मनमाडला पुनरागमन
तब्बल १४ दिवस दडी मारल्यानंतर बुधवारी आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने शहर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
निफाड शहरासह तालुक्यात मुसळधार शहरासह तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसाने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त होत असून पेरणीपूर्व मशागतीला आता वेग येणार आहे. ७ जूनपासून मान्सूनच्या पावसाची शेतकऱ्यांसह सर्वच वाट बघत होते. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान मेघगर्जनेसह पावसाला जोरदार सुरुवात झाल्याने हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला. पावसामुळे रखडलेल्या शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग येणार आहे.
चांदवडला वादळी वाऱ्यासह तडाखा शहर परिसरात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एक तास मध्यम व जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात मध्यम व जोरदार स्वरूपाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे उंच-सखल भागात पाणी साठले तर रस्ते जलमय झाले होते. शेतकरी व नागरिकांना मात्र दिलासा मिळाला.
सायखेड्यासह परिसरातील गावांत हजेरी दीर्घ प्रतीक्षेनंतर येथे व परिसरात बुधवारी दुपारी चार वाजता जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकरीवर्गाला दिलासा मिळाला आहे. बुधवारी जोरदार पाऊस झाल्याने खोळंबलेल्या शेतीकामांना वेग येणार आहे. सायखेडा, चांदोरीसह गोदाकाठ परिसरातील अनेक गावांत पावसाने हजेरी लावली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.