आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘धरण उशाला, कोरड घशाला’ अशी परिस्थिती मानवेढे, बोर्ली, जामुंडे गावांसह वाड्यांची झाली आहे. जलजीवन योजनेंतर्गत मानवेढे येथे पाणीपुरवठा योजनेचे काम तांत्रिक कारणामुळे बंद असल्यामुळे मानवेढे आणि परिसरातील अनेक वाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी थेट गुरुवारी भावली धरणावर जाऊन समृद्धी व इगतपुरीचा पाणीपुरवठा बंद पाडला व पाण्याच्या टाकीवर जाऊन ‘शोले’ स्टाइल आंदोलन केले.
इगतपुरी, शहापूर आणि समृद्धी महामार्ग प्रकल्प यांना इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाचे पाणी दिले जाते, मात्र मानवेढे आणि परिसरातील गावे तहानलेले आहे. यामुळे महिलांनी आंदाेलन केले. जोपर्यंत मानवेढे व परिसरातील गावांना पाणी दिले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतल्याने शासनाची धावपळ उडाली होती. सुमारे दोनशे महिला पुरुषांनी आंदोलन सहभाग घेतला. यात विशेष म्हणजे महिलांची संख्या जास्त होती. सुमारे पाच तास हे आंदोलन सुरू होते. दरम्यान, मुख्याधिकारी पंकज गोसावी गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, अभियंता जीवन शहा यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांची समस्या समजून घेत पाणी देण्याचे आश्वासन दिले. यानंतर दुपारी चार वाजता आंदोलन मागे घेण्यात आले.
धरणात ज्यांच्या जमिनी गेल्या तेच गावे तहानलेलेच
समृद्धीच्या कामासह इगतपुरी व घोटीचा पाणीपुरवठा सुरळीत होत आहे. मात्र धरणात ज्यांच्या जमिनी गेल्या ते गावकरी तहानलेले आहे. त्यामुळे संतापलेल्या महिला ग्रामस्थांनी आक्रमक आंदोलन करून समृद्धी आणि इगतपुरीचा पाणीपुरवठा बंद केला. पाणी मिळत नसल्याने महिलांनी शासनाचा निषेध व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.