आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपण का जगत आहोत? कसे जगत आहोत? काय जगत आहोत? हे समजून घेतले तर जगणे सुसह्य होते. असे विचार ख्यातनाम कवी कमलाकर देसले यांनी येथे व्यक्त केले.ज्येष्ठ नागरिकसंस्थेच्या सभागृहात झालेल्या पुरुषोत्तम. ठाकूर गुरुजी स्मृती अक्षय व्याख्यानमालेत ८वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. ‘जगणे समजून घेताना ‘हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. आर. हिरे होते. देसले यांनी सध्या वाचायलासुद्धा वेळ नाही.व्हॉट्सअँपवर आलेले मेसेज न वाचताच पुढे पाठविले जातात. मोबाइलचा वाढता वापर धोकेदायक आहे. उद्याच्या जगात याबाबीचा भस्मासुर झालेला असेल. मनाचे विकार वाढलेले असतील आणि प्रत्येकाला समुपदेशनाची गरज भासेल. जगायचे का हे समजून घ्यायचे असेल तर गीतेतील कृष्णाच्या विराट दर्शनापासून शिकावे.
तुझे रे जीवन कोडे मला नाही उमगले बा। मला इतकेच कळले की मला काही न कळले बा।। सामान्यासारखाच अर्जुनाचाही भ्रम तसाच होता. परंतु भगवंताच्या विराट रूपाने त्याला खरे स्वरूप समजले. गीता त्यांच्यासाठीच आहे जो स्वतःला अर्जुन म्हणून घेतो. भारतीय समाज प्रतीक पूजक आहे, तो विचार पूजक हवा होता. जीवन हे प्रवाही आहे. त्यात अनुकूल-प्रतिकूल येणार हे गृहित धरले पाहिजे.
आपण सगळे समजून घेतो पण जगणे समजून घेत नाही. दुर्बल हा केव्हातरी सफल होऊ शकतो. व्यक्तीला मान, पुरस्कार, नेतृत्व, आदर आदी बाबींची इच्छा असते. मात्र यासाठी मृत्यूचे महाद्वारही समजून घेतले पाहिजे. आम्हास सन्मान हवा असेल तर दुसऱ्यासही सन्मान दिला पाहिजे. आम्ही मानाची अपेक्षा करतो मात्र दुसऱ्यास अपमानाने वागवितो. द्वेषाची परिणिती ही आपल्या कृतीत असते. बाभूळ लावून आंबे निर्माण करण्याची अपेक्षा कशी धरता येऊ शकते? जगणे समजून घेताना मेंदूऐवजी तुम्ही हृदयाकडून उत्तरे घेतली तर अधिक जीवन सुखी होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. भगवान बागूल यांनी सूत्रसंचालन केले. निंबा सूर्यवंशी यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.