आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री ढगफुटीसदृश:दाेन तासांतच हाेत्याचे नव्हते, डोळ्यादेखत पिके गेली वाहून

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागात गुरुवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. दापूर, डुबेरे, सोनांबे, पांढुर्ली, वडगाव पिंगळा परिसरात दोन तासांत शेत पिकांचे होत्याचे नव्हते झाले. शेतीला तलावाचे स्वरूप आले तर नदी-नाल्यांचे पाणीही शेतात घुसले. अनेक ठिकाणी जमीन वाहून जाण्याच्या घटना घडल्या. देव नदीच्या पुरामुळे दोन पूल वाहून गेले. तर सोनांबे, डुबेरे मार्गावर प्रथमच देव नदीचे पाणी पुलावरून वाहिले.​​​​​​​

जाेरदार पावसाने ३० पेक्षा जास्त गावांना तडाखा बसला. पांढुर्ली, सोनांबे, डुबेरे, मनेगाव येथे कृषी पंपाचा वीजपुरवठा ठप्प झाला. २२ वीज खांब कोसळले आहे. तर रस्ते वाहून जाण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. वडांगळी येथील बाजार तळातील दुकानात पाणी शिरल्याने नुकसान झाले.

देवपूर जवळील देव नदीवरील पुलाचा काही भाग खचल्यामुळे त्यात डंपर अडकून पडला. मेंढी मार्गावरील पुलाजवळचा रस्ता वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली. डुबेरे व सोनांबे मार्गावरील पुलावरून रात्रभर पाणी वाहिले. त्यामुळे या गावांचा संपर्क तुटला होता. वडगाव पिंगळा येथे आईभवानी मार्ग वाहून गेला. नायगाव घाटात रस्ता खचला तर मुळगावचा पूल खचला आहे. मका, सोयाबीन, टाेमॅटाे, फ्लॉवर, कोबी, वटाणा या पिकांचे नुकसान झाले. दापूर, सोनांबे, हिवरगाव, कोमलवाडी, गुळवंच, पाटपिंप्री, धोंडबार, औढेवाडी, पांढुर्ली आदी ३० हून अधिक गावांना तडाखा बसला. शेतातील माती वाहून गेली. सायंकाळी उशिरापर्यंत २३४३ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने केली आहे. १२५३ हेक्टर वरील सोयाबीन, २१९ हेक्टरवरील मका, ७४७ हेक्टरवरील भाजीपाला, ३८२ हेक्टरवरील भात व इतर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला अाहे.

दोन शाळा बंद
सोनांबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देव नदीचे पूर पाणी घुसल्याने बहुतांश वर्ग व केंद्रप्रमुख कार्यालयात गाळ साचला होता शाळेची संरक्षक भिंत कोसळली त्यामुळे शाळेला सुट्टी देण्यात आली होती. मुसळगाव प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना पुरामुळे येण्यास अडचण होती म्हणून शाळेला सुट्टी देण्यात आली.
ठाणगावला शेतीचे नुकसान

ढगफुटीसदृश परिस्थितीने ठाणगाव ते केळी मार्गावरील पुलावरून पाणी वाहिले. परिसरातील वटाणा, टाेमॅटो वालवड, कोबी, फ्लॉवर आदी पिकांचे नुकसान झाले. शेतात गुडघ्याच्या वर पाणी साचले होते. विजेचे खांब कोसळून पडले. गोहदरी, मारुती मोढा, लावदरी, उंबरदरी, ब्राह्मणदरा भागात शेतीचे नुकसान झाले. एवढा पाऊस हयातीत पाहिला नाही

एवढा पाऊस आपण आपल्या ७० वर्षांच्या हयातीत पाहिला नाही. दोन तासांत होत्याचे नव्हते झाले. पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. - म्हाळूशेठ केदार, दापूर, मुकुंद वाजे, पांढुर्ली

​​​​​​​

बातम्या आणखी आहेत...