आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील डोंगरकिन्हीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून खुलेआम अवैध दारू धंदा सुरू आहे. गावातील तरुण अंमली पदार्थांच्या आहारी जात आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी दारूबंदीसाठी आवाज उठवत 25 जुलै रोजी मालेगाव पोलीस ठाणे गाठून दारूविक्री बंदीच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यात निवेदन दिले.
गावात अवैधरीत्या दारू विक्री होत असल्याने गावातील पुरुष व तरुणांना दारूचे व्यसन लागले आहे. गावातच दारू उपलब्ध होत असल्याने नशेबाज पती घरातील महिलांना वाद घालतात आणि मारहाण करतात. किरकोळ भांडणाच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे गावातील अवैध दारू व्यवसायावर कारवाई करून त्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी.
गावात दारूबंदी केली नाही, तर या मागणीसाठी पुढील वेळी सर्व महिला उपविभागीय पोलीस अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक वाशीम यांचे दरवाजे ठोठावतील, असा इशाराही महिलांनी दिला.यावेळी तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष सेवाराम आडे व महिला शिल्पा दादाराव गवई, मनीषा प्रकाश अंभोरे, शोभा मधुकर कराळे, ज्योतीबाई युवराज आडे, सोनाली योगेश गवई, उषा मधुकर गवई, दुगाबाई कैलास गवई, सुमनबाई गवई, निर्मला ठाकरे, रेखाबाई बबन भगत, उज्ज्वला संतोष उचित आदी महिला पोलिस ठाण्यात उपस्थित होत्या.
पोलिसांनी तत्काळ छापा टाकून अवैध देशी दारू जप्त केली मालेगाव पोलिस ठाण्यात दारूबंदीबाबत महिलांनी निवेदन दिल्यानंतर मालेगाव पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. २५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भगत यांच्यासह सहकाऱ्यांनी पंचांसह डोंगर किन्ही गावातील निसर्ग रेस्टॉरंट वर धाड टाकून डोंगर किन्ही गावातील सुधाकर नायबराव देशमुख वय ४० याला अवैध देशी दारू विक्री करताना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून १८० मिली देशी दारूच्या १० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी शासनाच्या बाजूने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भगत यांनी मालेगाव पोलिस ठाण्यात २५ जुलै रोजी रात्री ८ वाजता फिर्याद नोंदवली असून, गुन्हा क्रमांक ३०५ / २०२२ नोंदवून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारू बंदी कायद्याच्या कलम ६५ इ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश भगत करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.