आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे कामगार विक्रम नागरेंना धमकी:सराईत गुन्हेगारांनी उकळले 10 लाख; सात जणांवर गुन्हा दाखल

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप कामगार आघाडीचे प्रदेश चिटणीस विक्रम नागरे यांना वेळाेवेळी धमकी देऊन सराईत गुन्हेगारांनी 10 लाख रुपयांची खंडणी उकळली. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एका संशयीतास अटक करण्यात आली आहे.

गुन्हा दाखल

विशेष म्हणजे मागील महिन्यातही नागरे यांच्याकडून एका सराईताने 50 हजाराची खंडणी व माेबाईल उकळण्यात आल्याप्रकरणाचा गुन्हा सातपूर पाेलिस ठाण्यात दाखल झालेला आहे. एकाच व्यक्तीकडे आणि तेही रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार खंडणी उकळत असल्यामागील गाैडबंगालामुळे पाेलिस यंत्रणाही चक्रावली आहे.

आयफोनची केली होती मागणी

मागील महिन्यात सातपूरच्या श्रमिकनगर परिसरात राहणाऱ्या अक्षय युवराज पाटील या सराईताने नागरे त्यांच्याकडून माेबाईल उकळला हाेता. इतकेच नव्हे सबंधिताने बुलेट गाडी, 50 हजार रुपये व आय फाेनचीही मागणी केली हाेती. नेहमीच्या धमक्यांमुळे नागरे यांनी पाेलिसात तक्रार केल्यानंतर पाेलिसांनी अक्षय पाटील याच्या विरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला हाेता. सध्या ताे मध्यवर्ती कारागृहात आहे.

काय आहे प्रकरण?

अक्षय पाटील प्रमाणेच रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार दीपक भास्कर भालेराव, राेशन हरदास काकड, गणेश अशाेक लहाने, गाैरव उर्फ गुलब्या घुगे, अनिवरुध्द शिंदे, जया दिवे आदींनी विक्रम नागरे यांच्या अशाेकनगर येथील इंदु पॅलेस या फ्लॅटवर दगडफेक केली. तसेच अशाेकनगर भाजी मार्केट जवळील त्यांचे पाेस्टर फाडले. 1 जानेवारी 2020 ते 30 ऑक्टाेबर 2022 या कालावधीत संशयीत दीपक भालेराव व राेशन काकड यांनी संगनमताने नागरे यांना त्यांच्या शेताच्या रस्त्यावर अडवून जीवे मारण्याची धमकी देत वेळाेवेळी त्यांच्याकडून 10 लाख रुपयांची खंडणी उकळल्याची तक्रार नागरे यांनी सातपूर पाेलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी पाेलिसांनी अनिरुध्द शिंदे याला अटक केली आहे.

नेतेमंडळीस कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्का

गेल्या महिन्यात याच भाजपाचे बाहुबली समजल्या जाणाऱ्या तसेच भाजपाच्या माजी मंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष यांच्यासह नेते मंडळींच्या निकटवर्तीय मानले जाणारे नागरे यांना थेट धमकवण्याचा प्रकार उघडकीस आल्याने पक्षाच्या नेतेमंडळीस कार्यकर्त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. संशयित व फिर्यादी यांचे काही सबंध हाेते का? याची खातरजमा पाेलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...